विसर्जन काळात जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या महेशच्या मृत्यूस सुरक्षाव्यवस्था आणि विसर्जन व्यवस्था जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी घेऊन मंगळवारी रात्री पवईतील नागरिकांनी पवई प्लाझा ते गणेशनगर गणेश विसर्जन घाट असा मूक कॅंडल मार्च काढला. बुधवारी प्रतिनिधींनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आपली मागणी ठेवली.
रविवारी गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या महेश गौडा या तरुणाचा पाय घसरून पवई तलावात बुडून मृत्यू झाला. या वेळी विसर्जनाचे कामकाज पाहणारी समाजसेवी संस्था व प्रशासनाने दाखवलेली दिरंगाई आणि निष्काळजीपणा यामुळेच महेशचा मृत्यू झाला आहे असा आरोप करत त्याला योग्य न्याय मिळावा अशी त्याचे नातेवाईक आणि मित्र मंडळींची मागणी आहे.
याच मागणीसाठी आणि प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्या ढिसाळ कामकाजाबद्दल निषेध नोंदवण्यासाठी तसेच महेशच्या परिवाराच्या समर्थनात पवईकरांनी पवई प्लाझा ते गणेशनगर गणेश विसर्जन घाट असा मूक कॅंडल मार्च काढला. तिथे त्याच्या प्रतिमेची स्थापना करून त्याच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून मौन पाळण्यात आले.
बुधवारी मोर्चातील प्रतिनिधींनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे पत्र त्यांना दिले.
याबाबत बोलताना भाजपचे राघव पै यांनी आवर्तन पवईला सांगितले, “आमची पहिली मागणी ही आहे कि महेशचे आई वडील वयोवृद्ध असल्याने त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही स्वतः आणि मित्रपरिवार यांच्या मदतीने त्याचा परिवाराला मदत तर करतच आहोतच, पण प्रशासनाने सुद्धा त्यांना योग्य ती मदत करावी अशी आमची मागणी आहे. विसर्जन कामात सामिल होणाऱ्या तरुणांची सुरक्षा आणि योग्य व्यवस्थापन विसर्जन काळात असावे याबाबत आम्ही वपोनि पवई पोलीस ठाणे यांच्याशी चर्चा केली आहे.
“पाण्यात उतरणाऱ्या एकही मुलाला लाईफ जॉकेट दिले जात नाही, विसर्जनासाठी जाणाऱ्या प्रत्येक मुलाला असे जॉकेट दिले जावे. विसर्जन काळात प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन सदैव तिथे तैनात असावेत अशी आमची मागणी आहे” असे युथ पॉवरचे मुंबई अध्यक्ष वीरेंद्र धिवार आणि स्थानिक समाजसेवक प्रभा बालन यांनी यावेळी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.