अटक दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि नाशिक येथे यापूर्वी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
लॉकडाऊनच्या काळात पवईसह, मुंबई, ठाणे, डोंबिवली, नाशिक आणि इतर ठिकाणी मिळून १० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखा युनिट १० ने अटक केली आहे. ९ ऑगस्ट रोजी पवई येथील घरात घुसून ३ लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्यावर गुन्हे शाखा त्याचा समांतर तपास करत होती. आरोपींकडून पोलिस अधिका्यांनी दीड लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
शमशुल अब्दुल कुद्दुस हक (वय ४०, राहणार भिवंडी) आणि इरफान सलीम खान उर्फ बादल एकनाथ पाटील (वय ३६, राहणार मुंब्रा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून मुंबई, ठाणे आणि नाशिक येथे दोघांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशुल हा मास्टरमाइंड आहे आणि तो कुलूपबंद असलेली घरे शोधण्यासाठी वेगवेगळ्या भागात फिरत असतो. तो एका मित्राच्या माध्यमातून खानला भेटला होता आणि नंतर त्याला आपला सहकारी बनविला.
९ ऑगस्ट रोजी पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील गृरुकृपा सोसायटीमधील आत्माराम शेळके यांच्या घरात कोणी नसताना या दोघांनी घराचा दरवाजाचा कोयंडा उचकटून घरात प्रवेश करत सुमारे ३ लाख रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरले होते. घरातील व्यक्ती ह्या गावी गेल्या असताना चोरट्यांनी हा डाव साधला. त्यांची मुलगी ज्योती राजपूत जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना दार उघडलेले दिसले आणि कुलूप तुटले होते. कपाटातून सोन्याचे दागिने गायब होते.
या संदर्भात राजपूत यांनी पवई पोलिस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दाखल केली होती. युनिट १० सुद्धा या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. ११ ऑगस्ट रोजी फिल्टरपाडा येथे संशयास्पदरित्या फिरत असताना दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली.
“आम्ही १.५ लाख किंमतीची चोरी केलेली चांदी जप्त केली आहे. लॉकडाऊन दरम्यान आरोपींनी १० पेक्षा जास्त घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी पवई पोलिस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे,” असे याबाबत बोलताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
No comments yet.