तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन करत जबरदस्तीने तिचे चुंबन घेणाऱ्या २५ वर्षीय रोमिओला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत अटक केली आहे. वसीम शेख असे या तरुणाचे नाव असून, पिडीत तरुणी आणि आरोपी दोघेही पवईतील एकाच परिसरात राहतात.
रविवारी पिडीत घरी परतत असताना हा प्रकार घडला होता. त्यानंतर पीडितेने ही घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. आरोपी वसीम शेख हा विवाहित असून, त्याला एक मुलगा असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता एकाच परिसरात राहतात. आरोपी इसम हा सातत्याने पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असे. यासाठी गेले काही दिवस तो सातत्याने तिचा पाठलाग करत होता. मात्र तरुणीने याकडे दुर्लक्ष करत त्याला टाळणेच पसंत केले होते.
‘रविवारी विक्रोळी येथून क्लासवरून परतत असताना सुद्धा आरोपी वसीम तरुणीचा पाठलाग करत होता. पीडित तरुणीने स्थानकात प्रवेश करत असतानाच आरोपीने तिचा हात पकडून खेचत जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले’ असे पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.
पीडितेने घडल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. ‘पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन आम्ही आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली’ असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
सहकारी महिला डॉक्टरशी अश्लील संभाषण करणाऱ्या डॉक्टरला अटक
सोबत काम करणाऱ्या महिला डॉक्टरशी अश्लील संभाषण करणाऱ्या डॉक्टरला सोमवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत डॉक्टर ही नुकतीच साकीविहार येथील एका रुग्णालयात कामास लागली आहे. येथील एक पुरुष डॉक्टर पहिल्या दिवसापासूनच तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी दररोज तिला मेसेज करत असे. मात्र पिडीत महिला डॉक्टरने त्याला वैयक्तिक मेसेज करण्यास मनाई केली होती.
‘सोमवारी पिडीत डॉक्टर सायंकाळी ४ वाजता कामावरून घरी जाण्यास निघाली तेव्हा आरोपी डॉक्टरने तिला अजून दोन तास थांबण्यास सांगितले. मात्र तिने यास नकार देताच त्याने तिच्याशी हुज्जत घालत अश्लील भाषेचा वापर केला’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
तरुणीने घडला सर्व प्रकार सांगत दिलेल्या तक्रारीनंतर पवई पोलिसांनी भादवि कलम ५०६ (धमकावणे), ५०९ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा शब्दांचा वापर करणे) नुसार गुन्हा नोंद करून आरोपी डॉक्टर याला अटक केली.
No comments yet.