पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यावर डिप्रेशनमुळे उपचार सुरू होते. आपल्या वसतिगृहाच्या खोलीतील फलकावर त्याने संदेश लिहला होता की, आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये.
आयआयटी बॉम्बेच्या २६ वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे ४.३० वाजता पवई कॅम्पसमधील त्याच्या वसतिगृहाच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. दर्शन मालवीय असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, मास्टर्सच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असणारा दर्शन अनेक दिवसांपासून नैराश्याशी झुंज देत होता आणि त्यावर उपचार घेत होता. त्याने आपल्या वसतिगृहाच्या खोलीतील बोर्डवर इंग्रजीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. नोटमध्ये माझ्या मृत्यूसाठी कोणालाही दोष देऊ नये असा उल्लेख केला आहे. याप्रकरणी प्राथमिकरित्या पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ४.३०च्या सुमारास ही घटना घडली. वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाने जमिनीवर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज ऐकला आणि ते तपासण्यासाठी गेला असता एक विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याला आढळून आला. त्याने ताबडतोब वसतिगृह व्यवस्थापन आणि वरिष्ठांना याबाबत सूचित केले. जखमीला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले, असे पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असणारा दर्शन हा मूळचा इंदोर, मध्यप्रदेशचा आहे. तो आयआयटी मुंबई मध्ये प्रवेश घेण्यापूर्वीच नैराश्याशी झुंज देत होता. तसेच डॉक्टरांचे समुपदेशन देखील घेत होता. हॉस्टेल क्रमांक १२च्या चौथ्या मजल्यावर वसतिगृहाच्या खोलीत राहणाऱ्या दर्शनने सात मजली इमारतीच्या टेरेसवर जाऊन तेथून उडी मारली.
नैराश्याचे कारण आणि टोकाच्या कृत्याचे कारण पोलिसांना अद्याप समजू शकलेले नसले तरी, “त्याने आपल्या खोलीतील बोर्डावर सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की त्याच्या कृतीसाठी कोणीही जबाबदार नाही. लहानपणापासून त्याला असणाऱ्या त्रासातून त्याने हे पाऊल उचलले आहे,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी असेही सांगितले की, बेंगळुरूमध्ये शिकणारा त्याचा एक लहान भाऊ सोमवारी दुपारी मुंबईत पोहचला आहे. त्याने तपासकर्त्यांना सांगितले की, त्याचा मोठा भाऊ असे टोकाचे पाऊल उचलण्याबद्दल त्याच्याकडे कधीही काहीही बोललेला नाही.
पोलीस आणि आयआयटी मुंबईने त्याच्या पालकांना याबाबत कळवले असून, त्याचे वडील मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पवई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.