विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक, तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार
महाराष्ट्रातील ४१ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आज (बुधवार) स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मिलिंद खेतले यांचा सुद्धा समावेश आहे. विशेष सेवेसाठी यावर्षीचे राष्ट्रपती पोलीस पदक त्यांना जाहीर करण्यात आले आहे.
पोलिस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यात साकिनाका विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांच्यासह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, पुण्यातील एसआरपीएफचे सहाय्यक कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहेत.
राष्ट्रपतींकडून सलग तिसऱ्यांदा यावर्षी मिलिंद खेतले यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. यापूर्वी १९९७ साली शौर्य पोलीस पदक, २००७ साली गुणवंत सेवेसाठीचे पोलीस पदक त्यांना देण्यात आले आहे.
खेतले यांनी यापूर्वी परिमंडळ १२ गुन्हे शाखा प्रमुख, मालाड आणि मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. जोगेश्वरी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर सध्या साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते कर्तव्य बजावत आहेत.
No comments yet.