पवईत एका टेम्पोने दिलेल्या धडकेत ४० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून, घटनेनंतर टेम्पो चालकाने तेथून पलायन केले होते. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, टेम्पो चालकाला अटक केली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पवई प्लाझा येथे अपघात झाल्याची माहिती पवई पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलीस तिथे पोहचले असता काही नागरिक एका व्यक्तीला रिक्षातून रुग्णालयात घेवून जात होते. रस्त्यावर प्रवासी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
पोलिसांच्या मदतीने जखमीला त्वरित पवई हॉस्पिटल येथे घेवून जाण्यात आले मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला त्वरित राजावाडी रुग्णालय येथे हलवण्यात आले. राजावाडी येथील डॉक्टरांनी तपासून त्यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
पवई, हरिओम नगर येथे राहणारे वीरेंद्र मिश्रा हे आपल्या दुचाकीवरून कांजुरमार्गच्या दिशेने जात होते. ते पवई प्लाझा भागात असताना सिग्नल सुटल्यावर रस्ता ओलांडत असताना कांजुरमार्गकडून पवईकडे जाणाऱ्या वाहिनीवरून भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पोने त्यांना अचानक धडक दिल्याने ते खाली पडून गंभीर रित्या जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शिंनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पो तिथेच सोडून घटनास्थळाहून पळून गेला.
“मिश्रा यांच्या डोक्यावर, कपाळावर व हनुवटीवर गंभीर दुखापत झाली होती. त्यांना रुगणालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, भरधाव वेगाने व निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारवाहन अधिनियम १९८८ कलम १३४(अ), १३४ (ब), १८४ सह भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, ३२४ (४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. टेम्पोच्या नंबरवरून माहिती मिळवून त्याच्या मालकाशी संपर्क साधला असता झाहीद अलूमछाह अन्सारी नामक चालक तो टेम्पो चालवत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने माहिती मिळवत टेम्पो चालक अन्सारी याला आम्ही अटक केली आहे.”
No comments yet.