सोसायटीच्या आवारात काळजी घेत असलेल्या दोन आठवड्यांच्या २ मांजरांच्या पिल्लांना बेकायदेशीररित्या बाहेर निर्जनस्थळी सोडल्याबद्दल पवई स्थित, प्राणीप्रेमी नेहा शर्मा यांनी त्यांच्या सोसायटीचा सफाई कर्मचारी रामचंद्र याच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार शर्मा या एक मांजर आणि त्याच्या दोन पिल्लांचे पवईतील लेकहोम कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या आवारात काळजी घेत होत्या. “४ सप्टेंबर रोजी, मी आणि माझ्या मुलाने पाहिले की मांजरीची पिल्ले आमच्या सोसायटीमध्ये त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी नाहीत. अनेक तासांच्या शोधानंतरही आम्हाला मांजरीचे पिल्ले मिळून आली नाहीत. आमचा शोध सुरु असताना आम्हाला हे देखील कळले की, सफाई कर्मचाऱ्याने (रामचंद्र) मांजरीचे पिल्ले एका पिशवीतून नेऊन त्यांना बाहेर कुठेतरी सोडून दिले आहे,” असे याबाबत बोलताना नेहा शर्मा यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या “जेव्हा मी रामचंद्रला मांजरीच्या पिल्लांबद्दल विचारले तेव्हा तो निर्लज्जपणे हसला आणि आम्हाला त्यांच्या अचूक स्थानाबद्दल सांगण्याबद्दल टाळाटाळ करतानाच उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मी ज्येष्ठ पशु कार्यकर्ते आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी या प्रकरणाबद्दल मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. शेवटी माझ्या तक्रारीवरून ८ सप्टेंबर रोजी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन आठवड्यांच्या मांजरीच्या पिल्लांना निर्जनस्थळी सोडून त्यांना उपाशी राहण्यास भाग पाडणे, आईशी ताटातूट करणे आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे ही प्राण्यांची क्रूरता आहे. त्यांना बाहेर फेकल्यानंतर ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत, असे याबाबत बोलताना प्राणीमित्र यांचे म्हणणे आहे.
“आम्ही आरोपीविरुद्ध भादवि कलम ४२९ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०च्या कलम ११ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्याला बोलावून त्याचा जवाब घेण्यात आला असून, त्याने त्या मांजराना सोडलेले ठिकाण आम्हाला दाखवले. त्या ठिकाणी त्या मांजरांच्या पिल्लांचा शोध घेण्यात आला मात्र ती तिथे मिळून आली नाहीत. त्यांचा आसपासच्या इतर परिसरात सुद्धा शोध सुरु आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
No comments yet.