रिक्षा चालकाला चरित्र पडताळणीचा दाखला देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्विकारताना पवई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस नाईक संजय बोडके (३५) याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
पवईतील तुंगागाव येथील एका तरुणाने रिक्षाचा परवाना मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी त्यास चरित्र पडताळणीचा अहवाल सादर करण्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. यासाठी तरुणाने मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेकडे अर्ज करून अहवालाची मागणी केली होती.
सदर अर्ज पडताळणीसाठी पवई पोलीस ठाण्यात आला असताना चांगला अहवाल पाठवण्यासाठी अर्ज पडताळणीचे काम करणाऱ्या पोलीस नाईक बोडके याने तक्रारदार तरुणाकडे ४ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी रात्री पोलिसांनी सापळा रचून बोडके याला लाच स्विकारताना अटक केली.
No comments yet.