जगभरातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक छळ होत असल्याचा आरोप होत आहे. फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवरुन विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केलेल्या छळाला वाचा फोडली आहे. विशेष म्हणजे यात काही तरुणांनीही आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले आहे.
आरोप करण्यात आलेला विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. त्याला कॅम्पस फेस्टिवल ‘मूड इंडिगो’ या फेस्टिव्हलमध्ये मेंटॉर म्हणून नियुक्त केलं होतं. येथे येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करण्याची त्याची जबाबदारी होती. मेंटॉर म्हणून काम पाहत असताना तक्रारदार विद्यार्थी याची त्याच्याशी भेट झाली होती. नवख्या तरुण विद्यार्थ्यांसोबत तो हे जाणूनबुजून करत असल्याचा आरोप सुद्धा तक्रारदार विद्यार्थ्याने केला आहे.
आरोप करण्यात आलेल्या विद्यार्थ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंगेसचे शिष्टमंडळ आयआयटी विद्यार्थी डीन सौम्य मुखर्जी यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांनी भेट नाकारल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंगेसचे मुंबई अध्यक्ष अँड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयआयटी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करून, मुखर्जी यांच्या विरोधात घोषणा देत राजीनामा मागितला.
“ज्युनिअर विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी आयआयटी बॉम्बेच्या शिस्तपालन समितीकडे आल्या आहेत. मात्र, परिस्थितीजन्य पुरावे विद्यार्थ्याचं निलंबन करण्यासाठी पुरेसे नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे, असे याबाबत बोलताना अँड. अमोल मातेले यांनी सांगितले.
कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आहे. आरोपी विद्यार्थ्यावर कारवाई झाली नाही, तर पदवीदान संमारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही काही विद्यार्थ्यांनी दिला आहे. जे पाहता पोलिसांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कायदेशीर करवाई करावी यासाठी सहाय्यक आयुक्त साकीनाका विभाग मिलिंद खेतले यांना पत्र दिले असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यानंतरही योग्य ती कारवाई झाली नाही आणि सर्वसामान्य विद्यार्थीना नाहक त्रास सोसावा लागला तर आम्हाला आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल असा इशारा सुद्धा मातेले यांनी यावेळी बोलताना दिला.
No comments yet.