कोरोना लॉकडाऊनमुळे पवईमध्ये हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांवर रोजगार गमावण्याची आणि उपासमारीची वेळ आली आहे. मात्र या लॉकडाऊन काळात पवईतील आशा इंडिया ट्रस्ट सामाजिक संस्थेने पुढाकार घेत त्यांना मदतीचा हात दिला आहे. आशा मुंबईच्या कार्यकर्त्यांनी पाठीमागील अडीच महिन्यात सुमारे वीस हजारपेक्षा अधिक जेवण थाळ्या आणि १२०० पेक्षा अधिक रेशन कीटचे वाटप डॉ स्मिता पुनियानी यांच्या नेतृत्वाखाली करत एक सकारात्मक सामाजिक कार्य उभे केले आहे.
मुंबईचे खास आकर्षण असणाऱ्या पवईतील बरीच जनसंख्या छोट्या छोट्या चाळसदृश्य लोकवस्त्यांमध्ये राहते. बहुतेक लोक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या ग्रामीण भागातून स्थलांतरित झालेले आहेत. यामधील बहुतांशी लोक रोजंदारीची कामे आणि छोटे छोटे उद्योग करून आपले पोट आणि इतर गरजा पूर्ण करतात. मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचे हात थांबले आणि त्यापाठोपाठ पोटाला लागणारे अन्नही कुठून मिळणार असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला.
अचानक उदभवलेल्या कोरोना आपत्तीत आशा इंडिया ट्रस्ट आणि इतर सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आधी तयार जेवण आणि नंतरच्या काळात अन्नधान्याचे वाटप करून मदतीचा हात देत या कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.” असे याबाबत बोलताना पुनियानी यांनी सांगितले.
रेशन मिळू लागले
सरकारने या काळात अधिकृत घोषणा करून रेशन दुकानांद्वारे धान्य वाटप करण्याच्या योजना आखल्या, पण पवईतील वस्त्यांमध्ये हे रेशन धान्य पोहचू शकले नाही. संगीता सोनवणे यांनी जनवादी महिला संघटना आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनतर्फे रेशनकार्ड नसलेल्या लोकांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा म्हणून तो प्रश्न अहोरात्र लावून धरला. कोरोना प्रसाराच्या काळात फिरणे अशक्य असतानाही ७०० होऊन अधिक कुटुंबांपर्यंत त्यांची टीम पोहचून त्यांनी अन्नधान्याची मागणी करणारे अर्ज भरून घेतले व रेशन दुकानांशी तसेच भांडूप रेशनिंग ऑफिसशी संपर्क करून हे अन्नधान्य वाटप करण्यासाठी पाठपुरावा केला. “या पाठपुराव्यांना यश येत बिगर कार्डाचे रेशन आता मिळू लागले आहे. या कामात नगरसेविका वैशाली पाटील यांचेही मोठे सहकार्य लाभले,” असे याबाबत बोलताना संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.
आता अनलॉक १ झाले असले तरी आवश्यक प्रमाणात कामे उपलब्ध नसल्याने काही नागरिकांना अजूनही अन्नधान्याचा तुटवडा भासतो आहे. रोजगार अनिश्चित झाला आहे. कोणीही उपाशी झोपता काम नये ही भूमिका घेऊन आशाचे कार्यकर्ते आजही जोमाने काम करत आहेत.
आशाला अन्नधान्याची मदत करण्यासाठी किंवा गरजूंसाठी रेशन कीट मागण्यासाठी ९९८७६९५४१३ या नंबर वर व्हाट्सऍप करा.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.