पवई, ‘आविष्कार’मध्ये रंगल्या दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी गप्पा

पवई, चांदिवली परिसरात राहणाऱ्या हौशी सिने आणि नाट्य रसिकांसाठी मराठी नाट्यसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. विजय केंकरे यांच्यासोबत गप्पा आणि मुलाखतीचा कार्यक्रम आविष्कारतर्फे रविवारी आयोजित करण्यात आला होता. पवई परिसरात दर्जेदार मराठी कार्यक्रम करण्याचा एकमेव अजेंडा घेऊन आविष्कार मराठी मंडळ कार्य करत आहे.

मुलाखतकर्तीच्या भूमिकेतून विनिता सावंत यांनी केंकरे यांना बोलते केले. विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांची नुकतेच शंभरी पार केल्याबद्दल त्यांचा यावेळी आविष्कारतर्फे सत्कारही करण्यात आला.

पवईच्या लेक होम्स कम्युनिटी हॉलमध्ये रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य ठेवण्यात आला होता. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रसिक मंडळी हळूहळू जमायला सुरुवात होत अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण हॉल रसिक प्रेक्षकांनी भरून गेला. केंकरे यांना देखील बोलण्याची आवड असल्याने मुलाखतीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी लोकांना आपल्या प्रवासात सहभागी करून घेत जवळपास पुढचे दोन-अडीच तास सर्वांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या.

विनिता सावंत यांनी त्यांच्या प्रवासातील कटू गोड आठवणी आणि सहकारी कलाकार यांच्यावर विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाला बगल न देता त्यांनी निःसंकोचपणे उत्तरे दिली. रसिकांशी गप्पा मारताना ते इतके गुंतून गेले की अधून-मधून ज्या कलाकारांबद्दल ते बोलत होते, त्यांच्या लकबी, देहबोली दाखवत – दाखवत ते त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होते.

आपण नाट्यक्षेत्रात कसे आलो आणि नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात कसे रुजलो हा रंजक प्रवास त्यांनी यावेळी कथन केला. मराठी रंगभूमीवरील अनेक दिग्गज कलावंतांबद्दल आणि त्यांच्या थोरवीबद्दल त्यांनी अतिशय कृतज्ञतेने भाष्य केले. तसेच एक अभिनेता म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीतले त्यांचे अनुभवही श्रोत्यांना या वेळी ऐकायला मिळाले.

केंकरे यांचे वेगळेपण म्हणजे सिने-नाट्य क्षेत्रातील किंवा एकूणच नव्या पिढीतील कलाकारांबद्दल त्यांच्या मनात अतिशय आदराची आणि कौतुकाची भावना आहे. ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या अलीकडेच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यामुळे साहजिकच राज कुमार राव, हुमा कुरेशी या प्रथम फळीतील अभिनेत्यांशी त्यांचा जवळून संबंध आला. हे दोघेही कलाकार अतिशय शिस्तबद्ध व पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन कसे काम करतात याचा सुखद अनुभव दिलखुलासपणे केंकरे यांनी यावेळी सांगितला.

तसेच आलिया भट्ट सारखी गुणी व मेहनती अभिनेत्री सहजासहजी बघायला मिळत नाही असे प्रांजळ मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. थोडक्यात, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर “जुनं ते(च) सोनं’ असं मी अजिबात मानत नाही!” असे  म्हणून त्यांनी अगदी मनमोकळेपणाने नवीन पिढी बद्दलचे कौतुक व्यक्त केले.

आविष्कार मंडळातर्फे दिलीप सुळे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, तर सौ. उज्वला नायर यांनी सर्वांतर्फे त्यांना प्रेमाची भेटवस्तू देऊन गौरव केला. आरती गाडगीळ यांनी पाहुण्यांचे स्वागत व आभाराचे काम चोख पार पाडले.

कार्यक्रम संपला तेव्हा प्रत्येक श्रोत्याच्या चेहऱ्यावर निखळ आनंद स्पष्ट दिसत होता. अखेर गरमागरम शिरा आणि वाटते वडे यांचा स्वाद घेत असेच दर्जेदार कार्यक्रम पुढेही करण्याचा मानस व्यक्त करून आविष्कारने कार्यक्रमाची सांगता केली.

आविष्कारमध्ये सामील होण्यासाठी संपर्क करा दिलीप : 9819866681 उज्वला: 9867724809

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!