पटना बिहटा येथील चित्रपटगृह मालक निर्भय सिंघ यांची गोळ्या घालून हत्या करून फरार झालेल्या “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना आज (शनिवारी) पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तुंगा येथून अटक करून पटना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
बिहाट, पटना येथील नामांकित व्यक्तिमत्व आणि येथील उदय चित्रमंदिर सिनेमा हॉलचे मालक निर्भय सिंघ यांची चित्रपटगृहाच्या समोर मोटारसायकलवरून आलेल्या काही अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेनंतर येथील स्थानिक आणि दुकानदारांनी रस्त्यावर उतरत संपूर्ण बिहटा बंद केले होते. याबाबत पटना पोलिसांवर गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी दबाव सुद्धा बनवला जात होता.
पोलिसांना ही हत्या पूर्व वैमनस्यातून सुपारी देवून झाल्याचे समोर आल्यानंतर, निर्भय यांना मारण्यासाठी २ लाखाची सुपारी देणारा इसम अक्षय कुमार उर्फ गोलूसह “महाकाल” गॅंगचे ७ सदस्य विक्की कुमार, शिवम रवी सरकार, मनीष कुमार, रवी सिंघ, विपुल कुमार आणि चंदन कुमार यांना अटक केली होती. मात्र, या गॅंगचा म्होरक्या अमित कुमार आणि त्याचा जवळचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले होते.
“मुख्य आरोपी अक्षयच्या वडिलांनी जमिनीच्या व्यवहारात निर्भय यांच्याकडून ६ लाखाची रक्कम घेतली होती, त्यांची गेल्यावर्षी हत्या करण्यात आली होती. आईसोबत सुद्धा या पैशांना घेवून निर्भय यांचा वाद झाल्याने बदला घेण्याच्या हेतूने अक्षयने “महाकाल” गॅंगला याची सुपारी दिली होती” असे याबाबत सांगताना पटना विभागाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी माध्यमांना सांगितले.
“या गुन्ह्यातील दोन आरोपींचे शेवटचे लोकेशन पवईजवळ मिळाल्याने तेथील पोलिसांनी आपल्याला मदत मागितली होती. त्यांचा शोध घेत असताना ते दोन्ही आरोपी तुंगागाव येथे लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्याच आधारावर धाड टाकून आम्ही दोन्ही आरोपींना पकडून पटना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाघ यांनी सांगितले.
पवई पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपींची नावे जाहीर करण्यास नकार देतानाच हे दोन्ही आरोपी हे या हत्याकांडातील मुख्य सुत्रदार आणि “महाकाल” गॅंगचे म्होरके असल्याचे स्पष्ट केले.
No comments yet.