चांदिवली संघर्षनगर भागात विकासक, पालिका, स्थानिक प्रतिनिधी सर्वांनीच दुर्लक्ष केल्यामुळे अजूनही येथील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. याबाबत सतत पाठपुरावा करूनही काहीच परिणाम जाणवत नसल्यामुळे शुक्रवारी स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विकासक सुमेर कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर हल्लाबोल करत धरणे दिले.
बोरीवली राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या राहणाऱ्या हजारो परिवारांना दहा वर्षापूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत ३४ एकर जागेत बनवलेल्या १८३६२ घरात वसवण्यात आले होते. डोक्यावरील हे छत या परिवारांना मोठ्या संघर्षाने मिळाल्यामुळे या परिसराचे नामकरण सुद्धा संघर्षनगर असेच ठेवण्यात आले. मात्र त्याचा संघर्ष तिथेच थांबला नाही. रस्ते, पथदिवे, पाणी, खेळाची मैदाने, उद्याने अशा काही मुलभूत सुविधांसाठीचा त्यांचा संघर्ष अजूनही चालूच आहे.
‘दहा वर्षापूर्वी सरकारने आम्हाला राहायला घरे तर दिली, मात्र एवढ्या मोठ्या जागेत पसरलेल्या या परिसराला आजतागायत ना ही पक्के रस्ते मिळालेत, ना ही रस्त्यांवर पथदिव्यांची सोय आहे, अजूनही काही इमारतीत व्यवस्थितरित्या पाण्याची सोय नाही, मुलांना खेळायला मैदाने, उद्याने नाहीत. नुसत्या चार भिंती बांधून देवून मेंढर कोंबावीत अशी माणसे इथे कोंबून ठेवलीत’ असे याबाबत बोलताना स्थानिक भूषण मोरे यांनी सांगितले.
अखेर स्थानिक भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा मुद्धा आपल्या हातात घेत विकासक सुमेर कोर्पोरेशनला वारंवार पत्रव्यवहार करूनही रस्त्याचे काम करत नसल्यामुळे त्याच्या येथील स्थानिक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. काही कार्यकर्त्यांनी राग अनावर झाल्यामुळे त्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करत सरळ तोडफोडही केली.
भाजपा राष्ट्रीय युवा मोर्चा अध्यक्ष खासदार पुनमताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चांदिवली विधानसभा अध्यक्ष व नगरसेवक हरिश भांदिर्गे यांच्या नेतृत्वाखाली चांदिवली युवा मोर्चा अध्यक्ष रेशमा चौगुले आणि कार्यकर्त्यासोबत करण्यात आलेल्या उपोषणानंतर सुमेर कोर्पोरेशनतर्फे पुढील ४० ते ४५ दिवसात रस्ते व दिवा बत्तीची सोय करून देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
आश्वासनांवर आम्ही गप्प बसणार नसून, त्यांनी दिलेल्या वेळेत कामाची सुरुवात न केल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा भारायुमोतर्फे देण्यात आला आहे.
No comments yet.