चांदिवलीत लवकरच भव्यदिव्य असे नवीन रुग्णालय मुंबई महानगर पालिकातर्फे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३२२ कोटीं रुपये खर्च अपेक्षित असून, सल्लागार म्हणून नेमलेल्या कंपनीला फक्त सल्ला देण्याचे ६ कोटी पालिका मोजणार आहे. पूर्व उपनगरातील लोकांसाठी ही आनंदाची गोष्ट असतानाच या रुग्णालयाच्या निर्मितीवरून राजकीय श्रेयवाद सुरु आहे.
मुंबई महानगरपालिकेची ४ मोठी, १७ उपनगरीय तसेच इतर विशेष रुग्णालये मुंबईमध्ये आहेत. पण पूर्व उपनगरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि रुग्णालयांची कमतरता या परिस्थितीला लक्षात घेता हे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चांदिवलीमधील संघर्षनगरमध्ये हे रुग्णालय उभे राहणार आहे. या आठवड्यातील स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला.
एखादे रुग्णालय उभारणीसाठी आरोग्य तज्ज्ञांपासून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यामुळे ज्याच्याकडे हे सर्व तज्ज्ञ लोकांची उपलब्धता असेल त्यालाच हे काम दिले जाण्याची शक्यता आहे. या सल्ल्यांसाठी एकूण रक्कमेच्या १.८७ टक्के म्हणजे ६ कोटी २ लाख १४ हजार रुपये पालिका देणार आहे.
हे रुग्णालयाच्या निर्मितीने पूर्व उपनगरासह मुंबईतील इतर भागातील रुग्णांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र या रुग्णालयाच्या मंजुरीवरून विविध पक्षात चांगलाच श्रेयवाद रंगला आहे. उत्तर-मध्य मुंबईतून खासदार असणाऱ्या पूनम महाजन यांनी २०१६मध्ये लोकसभेत अर्थसंकल्पावर आयोजित चर्चासत्रात आपले मत मांडताना चांदिवली येथे एम्स सारखे रुग्णालय बनवण्यात यावे अशी मागणी केली होती.
मुंबई शहरात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक उपचारासाठी येत असतात त्यामुळे येथील सरकारी रुग्णालये खचाखच भरून जातात, त्यामुळे माझा मतदार संघ असणाऱ्या चांदिवलीमध्ये जो की मोठा परिसर आहे तिथे एम्ससारखे रुग्णालय उभे करून एक मोठी सुविधा आणावी. ज्यामुळे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला याचा फायदा होईल, असे आपले मत यावेळी महाजन यांनी मांडले होते.
तर दुसरीकडे स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे हे सुद्धा यासाठी पाठपुरावा करत होते. संघर्षनगर येथील एक लाख फुट आरक्षित भूखंडावर रुग्णालय बनवण्यात यावे यासाठी त्यांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. २४ डिसेंबर २०१९ला मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सह आयुक्त सुनील धामणे यांच्या कार्यालयात तातडीची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. यावेळी धामणे यांनी याला हिरवा कंदील दाखवत प्रशासकीय यंत्रणांना सूचना दिल्या होत्या.
कोरोना काळात रुग्णालयांची कमतरता जाणवू लागली होती. याच काळात त्या वेळच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या चांदिवली विधानसभा अध्यक्ष (सध्याच्या चांदिवली विधानसभा महामंत्री) रेश्मा चौगुले यांनी २७ जुलै २०२० रोजी पालिकेला पत्रव्यवहार करत संघर्षनगरमधील प्रलंबित हॉस्पिटलचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी केली होती.
संघर्षनगर येथील आरक्षित जागेवर महानगरपालिकेचे हॉस्पिटल बांधण्याचे काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. सदर हॉस्पिटल आज असते तर कोरोना सारख्या वैश्विक महामारीत औषधोपचारासाठी याचा उपयोग होत येथील नागरिकांना बाहेर जाण्याची गरजच भासली नसती. असे चौगुले यांनी पाठपुराव्यासाठी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
No comments yet.