पवईतलावाच्या धबधब्यावर भिजण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून पाण्यात वाहून जात असताना काही धाडसी तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याचा जीव वाचवल्याची घटना काल पवईत घडली. या चित्तधरारक क्षणाचा व्हीडीओ आज संपूर्ण सोशल मिडियाचा विषय बनला होता.
पवई तलाव पावसाळ्यात सर्व मुंबईकरांचे आकर्षणाचे ठिकाण असते. येथील डॅमवरून पडणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी तर तरुणाईची मोठी गर्दी उसळते. सोमवारी सुद्धा असेच काही तरुण येथे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. यातील एका तरुणाचा तोल गेल्याने तो धबधब्याच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात जावून पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला.
वाहत जात असतानाच किनाऱ्यालागत असणाऱ्या एका झाडाची फांदी त्याच्या हाती लागली आणि त्याच्या आधारावर बाहेर निघण्याची त्याची धडपड सुरु झाली. मात्र, जोरदार प्रवाहात त्याला फांदीचा आधार घेवून सुद्धा बाहेर निघणे शक्य होत नव्हते. अखेर हा मुलगा आता वाहून जाणार असे वाटत असतानाच, एका धाडसी तरुणाने झाडाचा आधार घेत पाण्याच्या आत उतरत त्याला खेचून बाहेर काढले. दोघेही बाहेर येताच हा संपूर्ण प्रसंग पाहत उभ्या असणाऱ्या तरुणांनी एकच कल्ला केला.
“आम्हाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली, मात्र तो पर्यंत काही तरुणांनी बुडणाऱ्या मुलाला बाहेर काढून त्या मुलासह सर्व निघून गेले होते”, असे याबाबत सांगताना पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
No comments yet.