पवईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावत्या अर्टिगा कारला आग लागून, जळून खाक झाल्याची घटना काल (मंगळवार, २६ नोव्हेंबर) रात्री घडली. आगीचे नक्की कारण समजू शकले नसून, वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रवासी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले; मात्र तो पर्यंत कार जाळून खाक झाली होती.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास अर्टिगा कार (एमएच ४७ एयू ८५८८) जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड़वरून दिशेने जात असताना कारच्या समोरील भागातून धूर निघत असल्याचे चालकाला आढळले. काही क्षणातच गाडीच्या पुढील इंजिन भागाने आग पकडत संपूर्ण गाडीला आपल्या कवेत घेतले.
गाडीने पेट घेतलेला पाहताच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी धाव घेत माती, पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली.
“भर रस्त्यातच गाडी जळत असल्यामुळे आग नियंत्रण येईपर्यंत काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,” असे पोलिसांनी सांगितले.
No comments yet.