चांदिवली, रहेजा विहार येथील रहेजा विस्टा सोसायटीने घरकाम करणाऱ्या महिलांसाठी नवीन दरपत्रक काढत सरसकट सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याच्या घातलेल्या घाटाच्या विरोधात येथील घरकाम करणाऱ्या महिलांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ज्याबाबत काल मनसे विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी दोन्ही पक्षांना समजावत आंदोलन पाठीमागे घेतले आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी योग्य मोबदला नाही दिला गेल्यास पुन्हा संपूर्ण परिसरासाठी आंदोलन करण्याचा इशारा या महिलांकडून देण्यात आला आहे.
महिला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एकीकडे महिला सक्षमीकरणाची टीमडी देशभर वाजवून फायदा लुटला जात आहे; तर दुसरीकडे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आणखी कमजोर करण्याचे काम होताना समोर येत आहे.“महिलांच्या दृष्टीतून जगाकडे पाहा” अशी मोठी मोठी घोषवाक्ये घेवून मिरवणाऱ्या देशाची खरी परिस्थिती मात्र गेल्या काही दिवसात वेगळीच झालेली आहे. रहेजा विहारमध्ये सुद्धा असेच काही घडत असल्याचे समोर आल्याने येथील घरकाम करणाऱ्या महिलांनी याविरोधात आंदोलनाचे हत्यार काढले आहे.
‘युनिटी इज पॉवर’ (संघटीत असणे हिच खरी ताकत) म्हणत गेल्या आठवड्यात रहेजा विस्टा सोसायटीने १ जून २०१७ पासून सोसायटीत काम करणाऱ्या महिलांच्या कामाचे दर निश्चित करणारे एक पत्रक काढत ते सर्व मेंबर्स पर्यंत पसरवले होते. या पत्रकात साफसफाई, जेवण बनवणे, कपडे धुणे यासारख्या कामांच्या दराबरोबरच, एक दिवस आणि तासानुसार कामाचे दर सुद्धा दिलेले आहेत. या दरांसोबतच त्यांनी घरकाम करणाऱ्या लोकांसाठी काही नियम सुद्धा या पत्रकात नमूद केले आहेत.
या पत्रकात नमूद केलेले दर हे घरकाम करणाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या मोबदल्याच्या १५ ते २०% कमी असल्याने घरकाम करणाऱ्या महिलांनी याला नकार दर्शवला होता. पुढे हे वारे सरळ सोशल मिडियावर सुद्धा आल्याने आता संपूर्ण परिसरच आप-आपले दरपत्रक काढेल आणि आपला हक्काचा मोबदला सुद्धा मिळणार नाही म्हणून त्यांचेच ब्रीदवाक्य त्यांनाच समजावून सांगण्यासाठी सर्व घरकाम करणाऱ्या महिलांनी संघटीत होत रविवारी आंदोलनाचा पवित्रा घेत कामबंद केले होते.
या आंदोलनात घरकाम करणाऱ्या सगळ्याच महिलांनी उडी घेतल्याने जवळपास २ दिवस अनेक परिवारांना या कामबंदच्या झळा बसल्या. बुधवारी संपूर्ण परिसरातच कामबंद करण्याचा इशारा या महिलांनी दिल्यानंतर मनसेचे विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी मध्यस्ती करत दोन्ही पक्षाची समजूत काढत यावर तोडगा काढण्याचे निश्चित करत महिलांना पुन्हा काम सुरु करायला लावले.
“आम्ही सकाळी आमच्या पोराबाळांना सोडून येथे कामासाठी येतो, राब राब राबतो आणि त्याचा योग्य मोबदला सुद्धा हे आम्हाला देणार नसतील तर मग काम कशाला करा? आज यांनी केले उद्या दुसरी करतील म्हणजे आम्ही जगायचे कसे?” आम्ही सध्या मिळतेय त्यात समाधानी होतो, यांनी त्यात पण काटछाट केल्यावर कसे चालणार, असे यावेळी बोलताना येथे काम करणाऱ्या महिला कामगाराने सांगितले.
“यांचे म्हणणे आहे तुम्ही बाहेर कमी मोबदला घेता आणि इथे जास्त मागता, आम्ही बाकीच्यांच्या सारखेच देणार असा यांचा हट्टाहास आहे, पण नुसते बिएचकेचे आकडे बघणारे हे लोक घराची लांबी रुंदी मोजायला विसरलेत. जिकडे कमी पैसे आकारले जातात तिथे घर पण छोटे असते, इथे घर मोठी आहेत. मग तसा मोबदला नको का मिळायला? जेवण बनवताना घरात असणाऱ्या माणसांची संख्या महत्वाची असते. त्यांनी सरसकट सर्वांना एकच मोबदला निश्चित केला आहे” असे जोर देत बोलत अजून एक घरकाम करणाऱ्या महिलेने सांगितले.
रहेजा विस्टा सोसायटीतील रहिवाशी महिलेने एका दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, “प्रत्येकवर्षी घरकाम करणाऱ्या महिला या पगार वाढवून मागत असतात. माझ्या घरात साफसफाई आणि जेवण बनवणे अशा कामासाठी दोन वेगवेगळ्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत. तीन वर्षापूर्वी मी साफसफाईच्या कामासाठी ७०० रुपये तर जेवण बनवणाऱ्या महिलेला २५०० रुपये पगार देते. वरून संपूर्ण पगार बोनस म्हणून दिला जातो. त्यानंतरही त्यांनी गेल्या वर्षी ३०% वाढीव पगाराची मागणी केली होती जी मान्य केली होती. आता पुन्हा या वर्षी सुद्धा ३०% पगार वाढ मागत आहे, प्रत्येक वर्षी एवढी पगार वाढ देणे कसे शक्य आहे?”
अजून एक रहिवाशी महिलेने याबाबत बोलताना सांगितले, “आम्ही महिलांना घरकामासाठी ठेवतो, त्यांना सर्व शिकवतो आणि काही वाढीव पैशासाठी मग त्या दुसरे घर गाठतात. घरकामासाठी येणारी प्रत्येक बाई ही आपल्या मर्जीला वाटेल ते दर सांगत असते. प्रत्येक घरात तेवढेच काम असते असे नाही. अनेक घरात भाड्याने लोक राहत असतात, अशा नवीन येणाऱ्या लोकांची घरकाम करणाऱ्या या महिलांच्या मनमानी दराने फसवणूक होते. मग या सगळ्यासाठी एक नियोजित दर असणे काय वाईट आहे?”
“या महिलांमुळेच आम्ही निर्धास्तपणे आपल्या नातेवाईकांना घरी बोलावतो. आम्ही उशिरा उशिरा पर्यंत बाहेर राहू शकतो. आमचे घर, आमचे जेवण, घराची स्वच्छता असे बरेच प्रश्न या घरकाम करणाऱ्या महिलांमुळे मिटलेले असतात. एवढेच काय आमच्या मुलांची काळजी सुद्धा या तेवढ्याच प्रेमान घेतात. यांच्या या कामाची किंमत ही त्यांची विश्वासाहर्ता, काम करण्याची पद्दत, घरातील लोकांशी असलेले नाते यावर ठरते. सर्वाना सरसकट एकाच पारड्यात तोलणे योग्य नाही. केवळ एक सोसायटीच्या बेजाबदार कृत्यामुळे परिसरातील इतर अनेक कुटुुंबांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला” असे याबाबत बोलताना रहेजा विहारमधील एका प्रतिष्ठित महिलेने सांगितले.
“घरकाम करणाऱ्या या महिला त्यांच्यावर अन्याय होत असल्याच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे आल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्या मागण्या काय आहेत या जाणून घेतल्या आहेत. काल या आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच मी सोसायटी प्रशासनाशी चर्चा करून यावर मध्य मार्ग काढण्याची मागणी केली होती, ज्यास त्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या दोन दिवसात दोन्हीकडील प्रतिनिधींना समोरासमोर बसवून आपण हा प्रश्न पूर्णपणे मिटवणार आहोत” असे याबाबत बोलताना मनसे विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
पवईत इतर परिसरात सुद्धा घरकाम करणाऱ्या महिलांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याचा आवर्तन पवईने घेतलेला आढावा
याबाबत आवर्तन पवईने हिरानंदानी, लेकहोम, नहार या ठिकाणी घरमालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांशी चर्चा केली असता या सर्वच ठिकाणी महिलांना अपेक्षित मोबदला दिला जात असल्याचे समोर आले आहे.
लेकहोम: येथील फेडरेशनचे सचिव आणि फेज ३ चे अध्यक्ष मजहर ठाकूर यांनी सांगितले, “आमच्या सोसायटीत असा कोणताही नियम नाही. या कामासाठी कोणताही दर निश्चित करणे अशक्य आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना त्यांच्या मागणी आणि कामाच्या व्यापानुरूप ८०० रुपये आणि अधिक असे मानधन दिले जाते, तर जेवण बनवण्यासाठी ३५०० रुपये आणि अधिक या प्रमाणे मानधन दिले जाते आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना योग्य सन्मान दिला जावा याची सुद्धा दक्षता येथे घेतली जाते.”
हिरानंदानी: येथील काही सोसायटी प्रशासनाशी बोलले असता येथे सुद्धा अशी कोणत्याच प्रकारची दरनिश्चीती नसल्याचे सांगतानाच, एका कामाचे एका महिन्याचे ८०० ते १००० रुपये व जेवण बनवणाऱ्या व्यक्तीला ४ हजार किंवा अधिक पगार दिला जात असल्याचे सांगितले. ज्याला येथे घरकाम करणाऱ्या महिलांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.
नहार: येथे सुद्धा दर निश्चिती नसून कामाचा भार पाहता त्याचा मोबदला निश्चित केला जातो. येथे एका कामाचे ७०० ते ८०० रुपये तर जेवण बनवण्याचे ३५०० ते ४००० रुपये दिले जातात.
No comments yet.