चांदिवली येथील रहेजा विहार भागात वाढत्या नशेखोरीला रोखण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे, रविवारी येथील रहिवाशांनी मैदानात उतरत धरणे आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. बाहेरील भागातून येणाऱ्या मुलांमुळे येथे नशाखोरी वाढत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी लेक साईड इमारत समोरील पालिका मैदानात मोठ्या प्रमाणात हजेरी लावत प्रशासना विरोधात हे धरणे आंदोलन केले. जवळपास ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी आपल्या परिसरात असणाऱ्या या समस्येला मोडीत काढण्यासाठी भर उन्हात धरणे देत आपला राग व्यक्त केला. या निषेध आंदोलनात बालकांपासून जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
पाठीमागील दोन दशकात पवईचा कायापालट करताना हिरानंदानी, एकता, नहार आणि के रहेजा गृपने मोठा हातभार लावला आहे त्यातीलच एक परिसर म्हणजे चांदिवली येथील रहेजा विहार. साकीविहार रोड आणि चांदिवली फार्म रोड अशा दोन मार्गांना लागून वसलेल्या या परिसरातील रहिवाशांना सुरुवातीपासूनच अनेक सोयीसुविधांना मुकावे लागले होते. रेसिडेंट्स असोसिएशन आणि फेडरेशन्सच्या पाठपुराव्यानंतर काही समस्यांचे थोडे उशिरा का होईना पण निरासण झाले. मात्र या एवढ्या मोठ्या परिसराला केवळ एकच येण्या-जाण्याचा मार्ग होता आणि दुर्घटना काळात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिक एक पर्यायी मार्ग या परिसराला असावा अशी मागणी सुरुवातीपासूनच धरून होते.
नागरिकांसह रेसिडेंट्स असोसिएशन आणि फेडरेशन्स यांनी यासाठी अनेक पाठपुरावा केल्यानंतर अखेर ऑगस्ट २०१५ मध्ये साकीविहार मार्गाला जोडणारा पर्यायी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला आणि आता आपल्या समस्या संपल्या असे समजून नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडलाच असेल कि नशाखोरीची एक नवी समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे.
‘पाठीमागील चार वर्षात या परिसरात अनेक पर्यायी मार्ग खुले झाले आहेत. सोबतच या परिसरात कामासाठी येणाऱ्या आसपासच्या परिसरातील लोकांच्या सुविधेसाठी सुद्धा काही मार्ग खुले करण्यात आले आहेत. मात्र या सर्वांचा फायदा घेत अनेक तरुण परिसरात प्रवेश करून उद्याने, खेळाची मैदाने आणि इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत ठाण मांडून बसून नशापाणी करत आहेत. नशेच्या भरात येथील नागरिकांशी भांडण आणि दुरव्यवहार केल्याच्या घटना सुद्धा परिसरात घडत आहेत. असा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
‘आम्ही पालिका आणि पोलीस प्रशासनाला वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन यावर कोणतीच ठोस पाऊले उचलत नव्हते. अखेर सर्व नागरिकांनी ही समस्या मोडीत काढण्यासाठी आणि प्रशासना विरोधात आपला रोष व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच भर उन्हात आम्ही धरणे आंदोलन देत आपला राग व्यक्त करत आहोत’ असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिक जि बी रेड्डी यांनी सांगितले.
माजी नौसेना अधिकारी आणि स्थानिक नागरिक दिनेश नायर याबाबत बोलताना म्हणाले कि, ‘आम्ही पोलिसांकडे केवळ एक महिन्यासाठी येथे पोलीस उभे करा अशी मागणी करत आहोत. आमचा कोणाच्याही खेळण्याला विरोध नाही आहे, तर खेळाच्या नावावर चालणाऱ्या सट्टाबाजार आणि नशाखोरीला आहे. खेळायला येणारे अनेक तरुण दारू, नशेचे सामान घेऊन येतात, बाटल्या आणि कचरा येथेच मैदानात फेकून निघून जातात. मुलांना महिलांना धमकावणे, त्यांची छेडछाड करणे असे प्रकारसुद्धा येथे घडत आहेत. ज्यामुळे आमच्या येथील महिला, मुले घरातून बाहेर निघायला सुद्धा घाबरत आहेत. आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपायुक्त याना तक्रार दिली आहे. मात्र काहीच कारवाई केली जात नाही.’
अजून एक नागरिक श्रीमती सोमण यांनी सांगितले कि, ‘दोन उद्याने आणि मैदाने आधीच त्यांच्यासाठी देण्यात आलेली आहेत. आता त्यांनी या लेक साईड इमारती समोर असणाऱ्या खेळाच्या मैदानावरसुद्धा कब्जा करून लोकांना त्रास देणे सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात बाहेरून मुले येऊन येथे क्रिकेट खेळतात. यांच्या नशेचे सामान संपूर्ण रस्त्यांवर आणि परिसरात पडलेले असते. महिलांशी छेडछाड होते. मैदानात क्रिकेट खेळणे बंद करण्यासोबतच नशाखोरी रोखण्यासाठी पोलिसांनी ढोस पाऊले उचलावीत एवढीच आमची मागणी आहे.’
‘परिसरात नशाखोरी रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आजपासून या परिसरात आम्ही गस्तींची वाढ सुद्धा करत आहोत’ असे यावेळी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी सांगितले.
‘रविवारची घटना म्हणजे दिवसा महानगर पालिकेच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांना मैदानातून बाहेर हाकलून लावण्यासाठी केलेले धरणा आंदोलन होते. सदरचे मैदान हे महानगर पालिकेचे असल्याने पोलिसांनी तसे करण्यास नकार दिला. तेथे खेळणाऱ्या मुलांनी कोणतीही नशा केलेली नव्हती. सदर मैदानात रात्रीच्या वेळी पोलीसांना बघून तेथे नशेसाठी बसणारी मुले पळून जातात, पोलीस तेथे बसणाऱ्या मुलांवर कारवाई करीत असतात. तेथील सुरक्षा रक्षकांकडून अशी माहिती मिळते की, रहेजा विहार येथे राहणारी मुलेही तेथे नशा करीत असतात.’ असेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबत बोलताना सांगितले.
‘पालिका उद्याने आणि खेळाची मैदाने ही सर्व नागरिकांसाठी असतात. एखाद्या परिसरातील नागरिकांनी त्याच्यावर हक्क दाखवणे किंवा दुसऱ्या परिसरातील नागरिकांना येण्यापासून रोखणे चुकीचे आहे. पालिका कोणासही उद्यानात किंवा मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही.’ असे याबाबत बोलताना पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.