चांदिवली येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या ‘नवोदित चांदिवली श्री २०१९ किताब चेंबूर येथील मसल इंजिनिअर्स व्यायाम शाळेच्या विनायक लोखंडे यांनी आपल्या नावे केला आहे. मुंबईतील विविध भागातून स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.
चांदीवली, पवईच्या इतिहासात प्रथमच एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली, ती म्हणजे ‘नवोदित चांदीवली श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा २०१९. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चांदीवली विधानसभा विभाग अध्यक्ष महादेव पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
मुंबईच्या विविध भागातून या स्पर्धेत तरुणांनी सहभाग घेतला होता. वजनी गट ५५, ६०, ६५, ७० आणि ७५ अशा विविध गटात ही स्पर्धा पार पडली. यावेळी पहिल्यांदाच शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक जास्त दिसले. अंतिम फेरीत उत्कृष्ट असा खेळ दाखवत मसल इंजिनिअर्स व्यायाम शाळेच्या विनायक लोखंडे याने ‘नवोदित चांदीवली श्री २०१९’चा मान आपल्या नावे केला.
स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातून मान्यवर उपस्थित होते. मनसे सरचिटणीस श्री राजाभाऊ चौगुले, विभाग अध्यक्ष श्री सुरेश नाना भिंताडे, दोन वेळा मिस्टर इंडिया सन्मान आपल्या नावे करून घेणारे विशाल सावंत, महाराष्ट्र श्री प्रवीण, मुंबई श्री २०१९ महेश गावडे, फिटनेस मॉडेल झारा शेख, ऑलम्पिया स्पर्धेत रजत पदक विजेते अरहान अन्सारी यांनी यावेळी उपस्थिती लावत नवतरुण शरीर सौष्ठवकांना मार्गदर्शन केले.
मोबाईलच्या या युगात युवा पिढी मैदान विसरली आहे. एकाच ठिकाणी बसून शरीर सैल पडू लागली आहेत. शरीर कसदार पिळदार असावं आणि निरोगी राहावं ह्या हेतूने, तसेच विभागातल्या मुलांना प्रोत्साहन मिळेल यासाठी हा उपक्रम सुरु केला असल्याचे यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले.
चांदिवलीच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पडलेल्या या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसाद पाहता पुढच्या वेळेस यापेक्षाही उत्तमरित्या आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्याचे आयोजकांकडून यावेळी सांगण्यात आले.
No comments yet.