सरकारी योजनेत बक्षिस लागल्याची बतावणी करून एका एनएसजी कमांडोला तब्बल २.४२ लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पवईत समोर आला आहे. या घटनेमुळे सायबर क्राईमचा घेरा वाढत चालल्याने एनएसजी कॅम्पमध्ये सुद्धा खळबळ माजली आहे. पवई पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.
उत्तरप्रदेशचा असणारा अजितकुमार पाल हा सैन्यदलात कर्तव्य बजावत असून, २६/११ आतंकी हल्ल्यानंतर मुंबईला सुरक्षाकवच प्रदान करण्यासाठी पवईजवळ बनवण्यात आलेल्या भारताच्या पाचव्या एनएसजी हबमध्ये त्याची निवड करण्यात आली आहे.
२५ जूनला सकाळी एका अनोखळी नंबरवरुन त्याला मोदी सरकारच्या योजनेतून १४.८० लाखाचे बक्षीस लागल्याचा मेसेज प्राप्त झाला होता. मेसेजमध्ये अभिनंदन करतानाच तुम्हाला महिंन्द्रा कंपनीची कार बक्षीस लागले असून, ती नको असल्यास १४.८० लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येईल असे सांगितले होते.
काही वेळातच एका अनोळखी नंबरवरुन पालला कॉल आला. समोरच्या व्यक्तीने डिको यादव अशी आपली ओळख करून देत, बक्षिसामध्ये कार हवी की, रोख रक्कम अशी विचारणा केली. सोबतच त्याने झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातून बोलत असून, मोदी सरकारने ही स्किम काढली असल्याचे सांगितले. रजिस्ट्रेशनसाठी फक्त ८ हजार ५०० रुपये भरले की, काही दिवसातच तुमचे बक्षीस मिळून जाईल असे सांगितले.
पाल याला सुद्धा खात्री वाटल्याने समोरच्या व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात त्याने रक्कम जमा केली. ज्यानंतर विविध कर आणि ट्रान्स्फर प्रोसेस पूर्ण करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या वेळेत मिळून, या महिन्याच्या ४ तारखे पर्यंत फोन करणारा व्यक्ती यादव, बक्षीस मिळणाऱ्या कंपनीचा मॅनेजर राकेश अशा वेगवेगळ्या नावानी ठगानी २.४२ लाख रुपये उकळले होते.
आवश्यक ती सर्व कारवाई करून, पैसे भरुनही बक्षिसाची रक्कम मिळत नाही, दोन्ही फोन बंद येऊ लागल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच, त्याने पवई पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दिली. याबाबत आरोपींचा शोध सुरु असल्याचे सांगतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिक माहिती देण्यास मात्र नकार दिला.
No comments yet.