मेडीकल जर्नल्स पुरवण्याच्या नावाखाली एका नामांकित खासगी रुग्णालयाची ३.२९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०१९मध्ये हॉस्पिटलची फसवणूक करणार्या याच आरोपीने या वर्षी जानेवारीमध्ये पुन्हा रुग्णालयाशी संपर्क साधल्यावर फसवणूक उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, हॉस्पिटलच्या लायब्ररीमध्ये वैद्यकीय जर्नल्सचा साठा करण्याचा उद्देशाने निविदा काढण्यात आली होती. ज्याबद्दल त्यांना ईमेलवर संपर्क साधण्यात आला होता. ईमेलवर पत्रव्यवहार झाल्यानंतर रुग्णालयाने सदर व्यक्तीला ₹६.५८ लाख मूल्याच्या २० मेडीकल जर्नल्ससाठी ऑर्डर दिली. तसेच हॉस्पिटलने बुकिंगसाठी अर्धी रक्कम आणि पुरवठ्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे मान्य केले. ज्यानुसार त्यांनी ३.२९ लाख रुपये दिले.
पंधरवड्यात डिलिव्हरी करण्याचे आश्वासन दिले गेले असताना, वेळेत पुस्तके वितरित केली गेली नसल्याने रुग्णालयाने सदर इमेलवर याबाबत चौकशी केली. बराच पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यानंतरही जर्नल्सच्या स्थितीबद्दल काहीच उत्तर मिळाले नाही.
हॉस्पिटलला या वर्षी जानेवारीमध्ये त्याच इमेल आयडीवरून चौकशी करणारा इमेल प्राप्त झाला. फसवणूक करणाऱ्या ईमेलवरूनच पुन्हा इंन्क्वाईरी येत असल्याचे लक्षात येताच रुग्णालयाने पवई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
No comments yet.