पवई येथील जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एक तरुण आणि एक महिला दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांना संशयास्पद रित्या रोडवर सापडले होते. त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. यातील आयआयटी मेनगेट बसस्टॉप पासून काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या विद्यार्थ्याचा ब्रेन हेमरेजमुळे मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत हिरानंदानी बसस्थानकाजवळ रस्त्यावर एक महिला मृतावस्थेत पोलिसांना मिळून आली होती. तिच्या शरीरात विष आढळून आले आहे. पवई पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे नक्की काय घडले आहे याचा शोध घेत तपास करत आहेत.
मुलुंड येथे आपल्या परिवारासोबत राहणारा निखील शहा आयआयटी बस थांब्यापासून काही अंतरावर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला दोन मोटारसायकलस्वारांना आढळून आला होता. त्याला डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रेन हेमरेजमुळे रूग्णालयातच त्याचा मृत्यू झाला आहे. निखील हा हिरानंदानी कॉम्प्लेक्समधील आयबीएस-आयसीएफएआय बिझिनेस स्कूलचा विद्यार्थी होता.
पवई पोलिसांनुसार, २१ वर्षीय निखील हाफ डे असल्याने दुपारी १ वाजता कॉलेजला आला होता. सायंकाळी ५.३० वाजता तो घरी परतण्यासाठी जेव्हीएलआरवरील आयआयटी पवई येथील बसथांब्यावर बसची वाट पाहत उभा असल्याचे त्याच्या एका मैत्रिणीने त्याला पाहिले होते.
जवळपास ६ वाजण्याच्या सुमारास तिथून मोटारसायकलवरून जाणाऱ्या आजम खान आणि त्याच्या एका मित्राने निखिलला रोडवर बेशुद्धावस्थेत पडलेले पाहिले. त्याच्या तोंडावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठला नाही. तेव्हा दोघांनी त्याच्याजवळ असणाऱ्या ओळखपत्राच्या साहय्याने परिवाराशी संपर्क करून त्याला हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले. असे निखिलच्या परिवाराने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
“डॉक्टरांकडे आम्ही चौकशी केली असता त्याच्या शरीरावर कसलाच घाव नसून, फक्त त्याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस गंभीर दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निखिलवर रुग्णालयात सर्वोतोपरी उपचाराचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यातून तो वाचू शकला नाही. शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
मुलाच्या या अचानक मृत्यूने परिवार संभ्रमात पडला आहे. त्याच्या कुटुंबास कशामुळे त्याचा मृत्यू झाला याची काहीच माहिती मिळू शकली नाही. आम्हाला निखिलच्या मृत्यूपाठी नक्की कारण काय आहे हे जाणून घ्यावयाचे आहे असे निखिलच्या नातेवाईकाने माध्यमाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
“आम्ही याबाबत गुन्हा दाखल करत परिसरात असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहोत मात्र त्यातून अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही. आम्हाला अचूक कारण माहित नाही. घटनास्थळावरून आम्हाला एक साक्षीदार किंवा पुरावा सुद्धा सापडला नाही. संध्याकाळी घटनास्थळी प्रवाश्यांची मोठी गर्दी असते मात्र या घटनेबाबत बोलायला कोणीच समोर येत नाही आहे,” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
त्याच्या परिवाराने त्याचे कोणाशीही कसलेच वैर नव्हते. तो कदाचित बसमधून पडून जखमी झाला असावा किंवा एखाद्या वाहनाने त्याला धडक दिली असावी असा अंदाज वर्तवला आहे मात्र आमच्या हाती सध्या काहीच धागेदोरे नसल्यामुळे त्याच्या मृत्युच्या पाठीमागील कारण सांगणे अवघड आहे असेही याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
हिरानंदानी बसस्थानकाजवळ रस्त्यावर एक महिला मृतावस्थेत पोलिसांना मिळून आली
दुसऱ्या एका घटनेत पवई पोलिसांना मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून एक महिला जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरील हिरानंदानी बसथांब्याजवळ बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता तिचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तिची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
“तिच्या शवविच्छेदनात तिच्या शरीरात विषारी औषध आढळून आले आहे. त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे का? तिला कोणी विष दिले आहे का? ती पवई तलाव भागात कशी पोहचली? असे अनेक प्रश्न सध्या आमच्या समोर आहेत. आम्ही परिसरात असणारे सीसीटीव्ही फुटेज मागवले आहेत. त्याच्या आधारावर तिच्या तिथे येण्याचे किंवा तिच्या बाबतीत काही माहिती मिळते का याचा आम्ही शोध घेत आहोत,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
No comments yet.