सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग कार्यालयात एका पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला. सुधीर गुरव (वय ४६) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते पवई पोलीस ठाण्याशी संलग्न होते. त्यांच्या आत्महत्येमागचे नक्की कारण समजू शकले नसून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याशी संलग्न असणारे गुरव यांची सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी ते नेहमी प्रमाणे आपल्या कर्तव्यावर सकाळी हजर झाले होते. संध्याकाळी ड्युटी संपवून सगळे घरी निघाले असताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना माझे काम आहे असे सांगून ते कार्यालयातच थांबले होते.
‘रात्रपाळी कर्तव्यावर असणारे कर्मचारी कामावर हजर झाले तेव्हा त्यांना गुरव पहिल्या मजल्यावरून खाली उतरताना असणाऱ्या भागात शिडीला शालीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले,’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
त्यांना त्वरित राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
‘गुरव यांनी हे पाऊल उचलले तेव्हा सर्व कर्मचारी निघून गेले होते. रात्री ९.१५ ते ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असावी. त्यांच्या जवळून किंवा त्या ठिकाणाहून कोणतीही सुसाइड नोट मिळून आली नाही’ असेही याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले.
पवई पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक माहितीच्या आधारे अपघाती मृत्यूची (एडीआर) नोंद केली असून, ते अधिक तपास करत आहेत.
गुरव यांच्या पश्चात पत्नी आणि एक २३ वर्षीय मुलगी आहे. ‘त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड हे समाधानकारक होते. कर्तव्यावर असताना ते कधीच निराश वाटले नव्हते किंवा त्यांना कोणता त्रास असल्याचेही ते कधी कोणाला म्हणाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे,’ आवर्तन पवईशी बोलताना त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी सांगितले.
No comments yet.