कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करत एका ठगाने पवईतील दोन बहिणींच्या खात्यातील सव्वा लाखावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
पवईतील आयआयटी परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाने १८ ऑक्टोबरला माथेरानला फिरायला जाण्यासाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून कॅब बुक केली होती. भाड्याचे पेमेंट करण्यासाठी कुटुंबातील मोठी मुलगी नेहाने कॅब कंपनीच्या अॅपमध्ये ८००० रुपये आपल्या खात्यातून जमा केले होते.
माथेरान येथे दोन दिवस सुट्टी घालवल्यानंतर घरी परतण्यासाठी कुटूंबियांनी पुन्हा त्याच कंपनीची कॅब मागविली. घरी परतल्यावर अॅपमध्ये भरलेल्या पैशांतून त्यांनी कॅबचे भाडे देण्याचा प्रयत्न केला मात्र पैसे जात नसल्याने त्यांनी रोख रक्कम देऊन भाडे चुकते केले. काम संपल्यानंतर अॅपमध्ये असलेली रक्कम पुन्हा नेहाच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला असता पैसे खात्यावर जमा झाले नाहीत. काहीतरी अडचण असावी असे समजून त्यांनी कॅब कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधून त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही.
काही वेळाने बहिणीच्या मोबाईलवर एका अनोखळी नंबरवरुन कॉल आला. कॉल करणार्याने आपण कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून, काय मदत हवी अशी विचारणा केली. तेव्हा बहिणीने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. ज्यानंतर त्या व्यक्तीने अॅपशी संलग्न नंबर घेत त्यावर एक कोड पाठवला आणि मोबाईलवर आलेली लिंक आपल्याला पाठविण्यास सांगितले. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात नेहाने म्हटले आहे.
“लिंकमधील कोड येत नसल्याचे सांगून त्या व्यक्तीने गुगल पे किंला फोन पे अॅपला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाची त्यांच्याकडे मागणी केली. तेव्हा नेहाच्या बहिणीने आपला मोबाईल नंबर त्यांना दिला. समोरील व्यक्तीने एक लिंक पाठवून संपूर्ण माहिती त्यात भरण्यास सांगितली. त्यानंतर त्याने पैसे ट्रान्सफर होत नसल्याचे सांगून अजून कोणाचा नंबर आहे का असे विचारले तेव्हा नेहाचा नंबर देण्यात आला त्या नंबरवर सुद्धा एक लिंक पाठवून माहिती भरण्यास सांगण्यात आले, असे याप्रकरणात बोलताना पोलिसांनी सांगितले.
“काही वेळातच खात्यात पैसे जमा होण्याऐवजी नेहाच्या खात्यातून ९८ हजार तर तिच्या बहिणीच्या खात्यातून १५ हजार ४९७ असे एकूण १ लाख १३ हजार ४९७ रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला होता.” असे याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच दोघींनीही बँकेला माहिती देत खात्यातील सर्व व्यवहार बंद करून पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.
No comments yet.