पवईत कोरोना बाधितांच्या आकडा वाढत असतानाच ४२% लोक कोरोनामुक्त होऊन आता घरी परतले आहेत. कोरोनाला घाबरू नका, आपली प्रतिकारशक्ती वाढवा. काळजी घ्या, तुम्ही लवकरच बरे होणार आहात! आपले प्रशासन मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे, त्यांना गरज आहे ते आपल्या सहकार्याची, असे सांगणे आहे कोरोना मुक्त झालेल्या पवईकरांचे. आपला कोरोना पॉझिटिव्ह ते कोरोनामुक्त पर्यंतचा प्रवास आवर्तन पवईला त्यांनी सांगितला. त्यातील काही निवडक अनुभव.
कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळलेल्या पवईतील बाधितांमध्ये पवईतील दोन पत्रकारांचाही समावेश होता. यातील एकाला हॉटेलमध्ये तर एकाला कर्वेनगर येथील संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. दोघांचेही या काळातले अनुभव वेगवेगळे राहिले, मात्र शेवट एकच दोघेही कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत आणि आपले दैनंदिन आयुष्य जगत आहेत. काय आहेत त्यांचे अनुभव?
१६ एप्रिलला मुंबई पत्रकार संघाने महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यातून मुंबईतील पत्रकार, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांच्या कोरोना चाचणीसाठी कॅम्पचे आयोजन केले होते. तपासणी शिबिरात मी आपली तपासणी करून घेतली. ताप, सर्दी, खोकला काही नसल्याने रिपोर्ट निगेटिव्ह येणार अशी खात्री होती. १९ तारखेला मी सकाळी कामावर निघण्याच्या तयारीत असतानाच मला पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने फोन करून तुम्ही कोठे आहात? तुम्ही घरातच रहा असे सांगत माझा पत्ता विचारला. नक्की काय झाले आहे याची मला कल्पनाही नव्हती.
मला शंका आल्याने मी पुन्हा त्या नंबरवर फोन करून नक्की काय झालेय याची विचारणा केली. तेव्हा त्यांनी मला माझा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगितले. मला काहीच सुचेनासे झाले होते. काही वेळात पालिका ‘एस; विभागातील अधिकाऱ्याने मला फोन करून तयार राहायला सांगत अम्ब्यूलंसने कर्वेनगर आणि नंतर गोरेगाव येथील एका संस्थात्मक अलगीकरण केंद्रात हलवले.
आराम आणि योग्य आहार हेच औषध
मला माहिती पडल्यापासून केंद्रावर पोहचलो तरी मी सुन्नच होतो. थोडीशी भीती ही वाटत होती माझ्या घरच्यांचे काय? वडील ज्येष्ठ नागरिक दोन भाऊ ते सुद्धा माझ्या संपर्कात होते. सुरुवातीचे दोन दिवस धाकधूक होती, चिंता होती, मात्र पुढील ५ दिवस कसे गेले कळलेच नाही. पालिकेचे डॉक्टर आणि इतर कर्मचारी वेळोवेळी फोनवर तब्येतीची विचारणा करत होते. माहिती घेत होते, मार्गदर्शन करत होते. दोन दिवसानंतर मला विटामिनच्या गोळ्या खाण्यास दिल्या, मात्र कोणतीच लक्षणे नसल्याने औषधे काहीच नव्हती. फक्त आराम आणि योग्य आहार घेण्यास सांगितले जात होते. अखेर २६ तारखेला पालिकेने मला फोन करून अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगत घरी सोडले. १४ दिवस मी घरी अलगीकरणात होतो आणि आता पूर्णपणे बरा झाल्याने आपल्या कामावर सुद्धा जातोय. घरच्यांनाही काहीच त्रास नाही.
माझ्या अनुभवातून एक सांगतो, लक्षणांकडे लवकर लक्ष दिले, योग्य काळजी घेतलीत तर आठ दिवसात बरे होता. सोशल डीस्टंन्सिंग पाळा, सॅनिटायझर वापरा, साबणाने सतत हात धूवत राहा, गरज नसताना गर्दीत जावू नका, मास्क वापरा आणि इतक करूनही संसर्ग झालाच तर मात्र घाबरू नका.
एक वेगळा अनुभव
दुसरा पत्रकार हा आयआयटी मार्केट जवळील फुलेनगर भागात राहतो, तो म्हणतो कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत असतनाच परिसरातील गरीब गरजू लोकांना रेशन, आवश्यक सामान पुरवण्याचे काम सुद्धा मी करत होतो. त्यातच मी राहत असणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात बाधित मिळू लागले होते. माझ्यामुळे इतरांना संसर्ग होवू नये म्हणून परिसरात ७ मे रोजी आयोजित कोरोना तपासणी शिबिरात मी टेस्ट करून घेतली होती. ९ मे रोजी त्याचे अहवाल आले आणि मला पालिकेने फोन करून मी पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.
आई-बहिणीची रडारड
माझा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ऐकून माझ्या घरात आई आणि बहिणीची रडारड सुरु झाली होती. त्यामुळे मी ही खचत होतो, मात्र मी त्यांना दिलासा देत मला काही नाही झाले, मी व्यवस्थित आहे आणि लवकरच बरा होऊन घरी येईन सांगितले. थोड्या वेळात पालिकेने अम्बुलंन्सने मला कर्वेनगर येथे अलगीकरण केंद्रावर आणून सोडले. माझी माहिती घेवून, मला लक्षणे नाहीत हे माहिती पडल्यावर १४ व्या माळ्यावरील एका खोलीत माझी सोय केली. माझ्या सोबत माझ्याच परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक होते. तिथे गेल्यावर कळले आमच्या परिसरातील सगळेच बाधित तिथे शिफ्ट केले आहेत, त्यामुळे अनोळखी असे काहीच नव्हते.
एक गादी, पाण्याची बादली, साबण, कोलगेट, ब्रश असे सगळे आधीच तिथे ठेवलेले होते. पहिला दिवस नवीन जागा आणि परिवाराची चिंता यातच गेला. झोप तर व्यवस्थित झालीच नाही. दुसऱ्या दिवशी घरातून आणलेले पिण्याचे पाणी संपले आहे हे लक्षात आल्यावर तेथील कर्मचारयांना पाणी मागितले मात्र त्यांनी आमच्याकडचे सुद्धा पाणी संपले आहे नवीन अजून आले नाही असे मला सांगितले आणि आमचा खरा स्ट्रगल सुरु झाला.
जेवण नास्त्याची हयगय
त्या दिवसापासून काही दिवसापर्यंत नास्ता, जेवण कधीच वेळेवर आलेले आठवत नाही. एक दिवस तर दुपारचे जेवण संध्याकाळी उशिरापर्यंत पोहचले नव्हते. उशिरा आले ते ही अर्धे कच्चे त्यामुळे काही लोकांनी खाल्ले तर काहींनी नाही. मात्र यात एक गोष्ट चांगली घडत होती की पालिका अधिकारी वेळोवेळी फोन करून तब्येतीची विचारणा करत होते. ज्यामुळे कुणाला काही त्रास जाणवत असेल तर उपचार सुरु होत होते.
प्रेरणादायी दिवस
आमचा स्ट्रगल सुरूच असताना आमच्या केंद्रावरील डॉक्टर / केंद्र प्रमुख बदलले, डॉक्टर जैन यांची तिथे नियुक्ती झाली होती. त्यांच्या येण्याने आमचे एकटे आणि निरस जीवन अचानक बदलून गेले होते. नास्ता, जेवण थोडे वेळेत येणे सुरु झाले होते. पण त्यापेक्षा एक वेगळा आणि मोठा बदल होता तो मानसिक स्वास्थ्य राखण्याचा. डॉक्टर सकाळी राष्ट्रगीत, योगा आणि प्रेरणादायी असे काहीसे उपक्रम राबवत होते. नास्त्यात कधी कधी इडली येवू लागली होती. काही संस्थांकडून खाण्यापिण्याचे सामान येत होते ते डॉक्टर आम्हा नेमलेल्या प्रतिनिधीमार्फत सगळ्यांना वाटत होते. त्यामुळे त्रासदायक दिवस बदलून प्रेरणादायी आणि आनंददायी असे सगळ्याने जीवन सुरु झाले होते.
या सगळ्यात आमचे अलगीकरणातले दिवस कधी संपले ते आम्हाला कळलेच नाही. आमचे अहवाल निगेटीव्ह येण्यास सुरुवात झाली होती आणि कोरोनामुक्त होऊन एक एक करत सगळे घरी परतू लागले होते. मी सुद्धा घरी परतलोय आणि एकदम ठणठणीत बरा आहे. सध्या १४ दिवस घरातच अलगीकरणात आहे. आईच्या हातचे पोटभर खातोय आणि स्वस्थ आराम करतोय. पण हा हे अलगीकरणातले दिवस संपले कि पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर होणार आहे. अजून बऱ्याच गरजू गरिबांना मदत करायची आहे.
या संपूर्ण अनुभवात एकच सांगेन कोरोनाला घाबरू नका. आपल्या प्रतिकारशक्ती वाढवण्यावर लक्ष द्या. काळजी घ्या आणि तुम्हांला संसर्ग झालाच तरी घाबरू नका, कारण तुम्ही लवकरच बरे होणार आहात.
ज्येष्ठ नागरिक परतले घरी
९ मे रोजी फुलेनगरमधील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या लोकांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा होते. ते म्हणतात मला मधुमेहाचा त्रास होता. वेळच्या वेळी जेवण नाश्ता मिळणे माझ्यासाठी खूप गरजेच असते. अलगीकरणात सुरुवातीला याचा त्रास झाला पण डॉक्टर जैन आले आणि माझे सगळे जगणेच सामान्य झाले. थोडा त्रास झाला खरा पण हा त्रास कोरोनाचा नव्हताच मुळी. खरा त्रास होता तो सायकोलॉजिकल होता, ज्याचा कोव्हीडशी सरळ काहीच संबंध नाही. आज मी कोरोनामुक्त होऊन ठणठणीत घरी आलो आहे. सध्या कोणताच त्रास नाही. माझा परिवार व्यवस्थित आहे, त्यांना सुद्धा काहीच त्रास नाही. मग या कोरोनाला घाबरणे खरच आवश्यक आहे का??? तर बिलकुल नाही. ज्येष्ठ नागरिकांना याने धोका आहे असे म्हणतात, पण मी म्हणेन योग्य काळजी घेतलीत तर काहीच धोका नसतो. हा फक्त एक वेगळ्या नवीन विषाणूंचा संसर्ग आहे एवढेच.
घरातच अलगीकरण
सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात बाधित मिळत आहेत. अशात जागा उपलब्ध करणे म्हणजे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असते. पण ज्यांना लक्षणेच नाहीत आणि त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यापेक्षा जर घरी योग्य आणि पुरेशी सोय असेल, तर केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावली प्रमाणे घरीच आयसोलेशनमध्ये ठेवल्याची काही उदाहरणे सुद्धा आहेत. अशांकडून ‘सेल्फ आयसोलेशन हमीपत्र’ भरून त्यांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. त्यांची काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती घरात असणे गरजेचे असते. त्या व्यक्तीने सतत डॉक्टरांच्या संपर्कात असणे आवश्यक असते. आवश्यक नियमावलीचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. घरातच अलगीकरणात असणाऱ्या बाधीताला सर्व्हीलांस अधिकाऱ्याकडून नियमित तपासणी करून घेणे बंधनकारक असते. अलगीकरण केलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असते. या सगळ्या नियमांचे पालन करत असे बाधितही ठणठणीत असल्याची उदाहरणे सुद्धा आहेत.
तुमच्या बॅगेत काय घेवून जायला हवे
खरेतर आजारी माणसाला रुग्णालयात किंवा घरी बघायला जाणारे लोक त्याला खाण्यापिण्याचे सामान घेवून जात असतात. मात्र कोरोना बाधिताच्या बाबतीत हे शक्य नसते. त्याच्या संपर्कात येण्यास मनाई असल्याने अशा व्यक्तीने अलगीकरण केंद्रात जाताना आपल्या बगेत काही आवश्यक गोष्टी घेवून जाणे गरजेचे आहे. त्या कोणत्या १) चादर (अंथरणे किंवा अंगावर घेण्यास कामी येते) २) पुरेसे कपडे ३) बिस्कीट, ड्राय फ्रुट्स, सुके अन्नपदार्थ ४) एखाद्या आजारावर औषधे सुरु असल्यास ती ५) स्वतःचा टॉवेल, आंघोळीचे कपडे, कपडे धुण्याचे साहित्य ६) पिण्याच्या पाण्याची मोठी बाटली (२ लिटर) ७) सॅनिटायझर, मास्क
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
कोविड-१९ अर्थात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य महामारी। च्या आजारापासून वाचण्यासाठी WHO आणि भारतातील प्रतिष्ठीत आरोग्य संस्थानी घ्यावयाच्या काळजी साठी मार्गदर्शक तत्वे आखून दिलेली आहेत,विविध माध्यमातून कळवली आहेत, अर्थात जर कोणी घरातून बाहेरच गेले नाही तर कोरोना चा संसर्ग होण्याची शक्यता नाही आणि जरी कोणत्याही कारणाने कोरोना संसर्ग झालाच तर काय काळजी आपण घ्यायची आणि विलगिकरण करण्यात आल्यानंतरची परस्थिती आणि त्यातून सुखरूप बरे होऊन बाहेर आलेल्या रुग्णाचे अनुभव दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत.सदर माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल आवर्तन पवई यांचे शतशः आभार.?