भारतीय चलनाच्या बदल्यात अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना पवई पोलिसांनी काल अटक केली आहे.
माझ्याकडे खूप सारे डॉलर आहेत, मात्र मला त्याबदल्यात थोडे पैसे द्या, ते मी तुम्हाला देतो असे सांगून मुंबईकरांना टोप्या घालणाऱ्या टोळीतील दोघांना पवई पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. तीन लाखाचा गंडा घालून पशार होत असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.
इम्रान अन्सारी (२१ वर्ष) राहणार- दिवा, फर्जाना अमीर उल्ला शेख (३४) रहाणार कोळेगाव, शीळ-डायघर अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या टोळीचा म्होरक्या मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला असून, पवई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुंबईतील ग्रँडरोड येथील व्यापारी यांना रुमालात कागद बांधून देऊन ते सात लाख रुपयांचे डॉलर आहेत असे सांगून, पळून जात असताना साक्षीदार व रेल्वे पोलिसांच्या मदतीने कांजूरमार्ग येथून अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी मोहमद अली यांचा ग्रँडरोड येथे व्यवसाय आहे. त्यांचे मित्र जावेद खान यांच्या संपर्कात या टोळीतील महिला फर्जाना आली होती. मी एका परदेशी नागरिकाकडे काम करत होते, जाताना त्याने मला भरपूर डॉलर दिले आहेत, मात्र त्याचा मला काहीच उपयोग नाही. तुम्ही त्याच्या बदल्यात मला थोडेफार पैसे द्या आणि ते तुम्ही घेवून टाका असे फर्जानाने सांगितले होते. तिने खात्री करून घेण्यासाठी काही डॉलर सुद्धा दिले होते. जावेद याने आपला मित्र मोहमद अली याला याबाबत सांगितले होते.
“डॉलर खरे असल्याची खात्री झाल्यानंतर तिच्या जवळ असणाऱ्या डॉलरच्या बदल्यात तिला ३ लाख रुपये देण्याचा व्यवहार सुद्धा नक्की झाला होता,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र डॉलर देण्यासाठी ते सतत जागा बदलत होते. अखेर ३-४ दिवस जागा बदलत असणाऱ्या या टोळक्याने पवईतील हिरानंदानीजवळ मंगळवारी २२ मे रोजी रात्री व्यवहार पूर्ण करण्यास बोलावले. तिथे पोहचताच पोलीस पाळत ठेवून असतात, असे बोलत त्यांनी लगबग करत रुमालात बांधलेला डॉलरचा गठ्ठा हातात सोपवला आणि पैसे घेवून तिथून पळ काढला. असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या सपोनि दर्जाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
रुमाल खोलून गठ्ठा उघडून पाहिला तेव्हा गठ्ठ्याच्या वर आणि खाली डॉलर वगळता कागदाचे तुकडेच होते. माझी फसवणूक झाली असल्याचे माहिती पडताच मी माझा मित्र जावेद याला याबाबत लगेच सूचित केले असे याबाबत पवई पोलिसांना दिलेल्या जवाबात फिर्यादी मोहमद अली यांनी सांगितले आहे.
जावेद हा कांजूरमार्ग स्थानकावर असताना त्याला या टोळीतील दोघेजण तिथे असल्याचे आढळून येताच त्याने रेल्वे पोलीसांच्या मदतीने त्यांना पकडून पवई पोलिसांना याबाबत माहिती दिली.
“आम्ही भादवि कलम ४०६, ४२०, ३४ नुसार गुन्हा नोंद करून दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांचा अजून एका साथीदाराचा शोध सुरु आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.
अटक आरोपींच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात दोन तर साकीनाका, जोगेश्वरी, एमआयडीसी, ठाणे, नवीमुंबई सह मुंबईमधील अनेक पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
No comments yet.