पती – पत्नी दरम्यान सुरु असणाऱ्या भांडणाच्या प्रसंगी पोलिस मदत मागवल्यानंतर निवासस्थानी गेलेल्या पोलिस हवालदाराला मारहाण केल्याबद्दल ४९ वर्षीय माजी सैनिकांला पवई पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र लावंड (४९) असे अटक आरोपीचे नाव असून, तो पवईतील हिरानंदानी येथे राहतो. संरक्षण दलात तो अल्प कालावधीसाठी (शॉर्ट सर्विस) कार्यरत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पोलिस कंट्रोल रूमला आरोपीच्या पत्नीने फोन करून, पती आपल्याला मारहाण करत असल्याबाबत माहिती दिली होती. याबाबत नियंत्रण कक्षाने पवई पोलिसांच्या गस्तीवर असणाऱ्या पथकाला घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले होते.
या गस्त पथकाचा भाग असणारे पोलिस नाईक प्रवीण सावंत (४६) तक्रारदार यांच्या घरी गेले असता, “सावंत यांना पाहून लावंड इथे का आला आहेस असे विचारत त्यांच्यावर ओरडला. यावेळी सावंत यांनी तुमच्या पत्नीने नियंत्रण कक्षाला मदत मागितली आहे असे सांगताच तो पुन्हा पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करू लागला. सावंत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच लावंडने त्यांना छातीवर बुक्की मारत, हनुवटीवर धारदार वस्तूने घाव केला. रक्तस्त्राव सुरु होताच सावंत यांनी आपल्या टीमला माहिती दिली. त्यानंतर लावंडला अटक करण्यात आली”, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
जखमी हवालदार सावंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरु आहेत.
लावंड यांच्याविरूद्ध भादवि कलम ३५३ ((लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी प्राणघातक हल्ला), ३३२ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून रोखण्यासाठी दुखापत करणे) आणि ५०४ (शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान) अन्वये गुन्हा नोंद करून न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
No comments yet.