गाडी ही प्रवासाचे साधन नसून, भरधाव पळवण्याचे साधन आहे, अशी समजच काही तरुणांमध्ये रुजलेली आहे. या भरधाव गाडीच्या शर्यतीत अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पवईमधील जेव्हीएलआरवर सुद्धा रात्री (बुधवार) भरधाव वेगात मोटारसायकल चालवणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ऋषभ रमेश मोरे असे या तरुणाचे नाव असून, तो मुलुंड येथे आपल्या परिवारासोबत राहत होता.
याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ हा रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ सिक्यू २३०८ वरून घरी परतत होता. जेव्हीएलआरवर पवई तलाव गणेशनगर गणेशघाट जवळ असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याची मोटारसायकल दुभाजकाला धडकून हा अपघात घडला.
तरुणाला त्वरित पवई पोलिसांनी राजावाडी रुग्णालय येथे नेले असता, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले.
‘काही तरुण रस्त्यावरून भरधाव वेगात मोटारसायकल चालवत होते. त्यांच्यात शर्यत लागली होती असे दिसत होते. अपघात झालेल्या गाडीसोबत अजून एक काळ्या रंगाच्या गाडीची शर्यत सुरु होती. यावेळी तरुणाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने दुभाजकाला जोरदार धडक दिली आणि त्याच्या आघाताने तो रस्त्यावर पडला.’ असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितल्याचे पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
‘तरुणांमध्ये नाईट आउटची क्रेझ वाढत चालली असून, रात्री मोकळ्या असणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवर भरधाव मोटारसायकली पळवणे, स्टंट करणे असे प्रकार सर्रास चालतात आणि त्यामुळेच अपघात घडतात. प्रत्येक ठिकाणी अशा घटना रोखण्यासाठी पोलीस उपस्थित असेलच असे नाही. आपला मुलगा रात्री काय करतो, कुठे जातो याकडे पालकांनी सुद्धा लक्ष घालणे तेवढेच आवश्यक आहे’ असेही ते पुढे म्हणाले.
No comments yet.