तुमच्या घरात आर्थिक चणचण आहे का? मुलबाळ होत नाही का? मग मी सांगते तो उपाय करा, असे सांगून धार्मिक विधी करण्याच्या निमित्ताने घरात घुसून, घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे.
तुमच्या घरात आर्थिक चणचण आहे का?, तुम्हाला मुलबाळ होत नाही का?, मी त्यासाठी उपाय करते, असे कारण सांगून घरात घुसत धार्मिक विधी करण्याच्या निमित्ताने एका महिलेने पवईतील अनेक गृहिणींना फसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गृहीणींकडून या महिलेने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील तुंगागाव येथे राहणाऱ्या चैताली जाधव या आपल्या सासू सोबत घरी असताना एक ५५-५८ वर्षांची महिला त्यांच्या घराजवळ आली. त्यांच्या सासूला या महिलेने तुमच्या घरात खूप समस्या आहेत. तुमच्या मुलांना प्रचंड त्रास आहे. समस्या दूर करण्यासाठी काही धार्मिक विधी करावे लागतील. मी हे धार्मिक विधी करून तुमच्या समस्या दूरू करू शकते, असे तिने सांगितले.
घरात समस्या सोबतच आर्थिक चणचण असल्याने चैताली यांची सासू हे विधी करण्यासाठी तयार झाली. विधी घरातच करावी लागत असल्याचे सांगत तिने घरात प्रवेश केला. जमिनीवर तांदूळ पसरवून एक पिठाचा गोळा काढला. तुमच्या घरात असणारे दागिने आणि रोख रक्कम त्यात ठेवण्यास सांगितले.
तिने काढलेल्या एका पिठाच्या गोळ्यात आमच्या जवळील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे जवळपास दोन लाखाचे दागिने आणि काही रोख रक्कम पिठाच्या गोळ्यात टाकल्याचे आम्हाला दाखविले. हा गोळा तळायला सांगून, गोळा कापडात बांधून सात दिवसांनंतर उघडण्यास सांगितले. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात तक्रारदार यांनी सांगितले आहे.
७ दिवसानंतर जाधव कुटुंबियांनी पिठाचा गोळा उघडून पाहिला असता त्यातून दागिने गायब होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी आजूबाजूला या महिलेबाबत चौकशी केली. याचवेळी त्यांच्या जवळच राहणाऱ्या नसीम सिद्दीकी या महिलेला सुद्धा अशाच प्रकारे ८० हजारांची रोकड लांबवत फसवणूक केली असल्याचे समजले.
ही बातमी परिसरात पसरताच याच परिसरातील गीता पवार या महिलेचे दहा हजार तर आशा हुके यांच्या घरातील सुमारे दीड लाखांचे दागिने घेऊन ही महिला पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.
तक्रारदार महिलांनी दिलेल्या वर्णनावरून गुन्हा नोंद करून, सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आम्ही तपास करत आहोत, असे याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले.
No comments yet.