हिरानंदानी येथील एवेलॉन इमारतीच्या १४ व्या मजल्यावर असणाऱ्या १४०२ फ्लॅटमध्ये शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज संध्याकाळी ७.४५ वाजता घडली. घटनास्थळी पोहचलेल्या हिरानंदानी स्पेशल टास्क फोर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी घडलेली नाही.
यासंदर्भात घटनास्थळी पोहचलेल्या पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी येथील एवेलॉन इमारत, ‘बी’ विंगच्या चौदाव्या मजल्यावर राहणारे गुरप्रीत सिंग अहलुवालिया आपल्या कुटुंबियांसोबत गुरुद्वारामध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. संध्याकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी सुरक्षा रक्षकाला याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या हिरानंदानी स्पेशल टास्क फोर्सने त्वरित इमारतीचा वीजपुरवठा बंद करून इमारतीच्या इतर माळ्यावर अडकून पडलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढून सोसायटीच्या परिसरात असणाऱ्या अग्निशमन सुविधेच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवले.
घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ‘शोर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज असल्याचे अग्निशमन अधिकारी पी एन शिंतोळे यांनी सांगितले.
“लिव्हिंग रुममध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक बेलमध्ये शोर्टसर्किट निर्माण झाल्याने ही लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बाजूलाच असणाऱ्या एका राउटरला, एक्सरसाईज मशीनला असणाऱ्या रबरी भागाला आणि जवळच असणाऱ्या लाकडी टेबलाला आग पकडली होती. तिथे पोहचलेल्या आमच्या एसटीएफने क्षणाचाही विलंब न-करता उपलब्ध साधनांच्या साहय्याने आग पसरण्यापूर्वीच त्याच्यावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळू शकली” असे याबाबत बोलताना हिरानंदानी समूहाचे सुरक्षा प्रमुख कमांडर संजय सिंग यांनी आवर्तन पवईला सांगितले.
संपूर्ण तपासणी करून धोका नसल्याची खात्री झाल्यावर इमारतीचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
No comments yet.