पवई येथील पवई विहार कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या २४ मजल्यांच्या साई सफायर इमारतीच्या १७व्या मजल्यावरील डक्टला आग लागल्याची घटना आज, गुरुवार, २० मार्च सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल होत त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, आगीचे नक्की कारण अद्याप समजले नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकाच आठवड्यातील पवई परिसरातील ही दुसरी घटना असून, शनिवारी हिरानंदानी येथील ईडन ४ येथील इमारतीच्या ६व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एसीमध्ये झालेल्या शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांनी तत्परता दाखवल्याने सुदैवाने या घटनेत देखील कोणीच जखमी झाले नव्हते.
गुरुवारी, सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास काही रहिवाशांना इमारतीच्या १७व्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे आढळून आले. “धूर निघत असून, आग लागली असल्याचे लक्षात येताच आम्ही त्वरित सर्व फ्लॅट धारकांना सूचना देत इमारत खाली करण्याच्या सूचना केल्या,” असे यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना रहिवाशांनी सांगितले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मरोळ, विक्रोळी आणि मुलुंड अशा विविध केंद्रातून ७ गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल होत काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

इडन – ४ इमारतीच्या ६व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एसीमध्ये झालेल्या शोर्ट सर्किटमुळे शनिवार १४ मार्चला आग लागल्याची घटना घडली
“आगीचे नक्की कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे काम अजून सुरु आहे. सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही,” असे यासंदर्भात पवई पोलिसांनी सांगितले.
“घटना घडलेल्या इमारतीपासून काहीच अंतरावर एक मिनी फायर स्टेशन आहे. मात्र या स्टेशनमध्ये कर्मचारी नाहीत कि बंबही नाही. आम्ही हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे, परंतु ना अग्निशमन विभाग ना पालिका याची गंभीर दखल घेत आहे,” असे चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनचे मनदीप सिंग यांनी सांगितले.
“एकाच आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. हिरानंदानी येथील इडन – ४ इमारतीच्या ‘बी’ विंगमधील ६व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी घडली होती. संपूर्ण घर या आगीत जळून खाक झाले आहे. घटनेवेळी घरात महिला आणि एक लहान मूल होते. इमारत त्वरित रिकामी करून इमारतीत असणाऱ्या सर्व अग्निशमन यंत्रणाच्या मदतीने सुरक्षारक्षक आणि इतर लोकांनी अग्निशमन दल पोहचण्यापूर्वीच वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.” असे येथील रहिवाशांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “विक्रोळी अग्निशमन केंद्र जवळ असले तरी वाहतूक कोंडीत अडकून गाडी पोहचण्यास उशीर होतो. हा परिसर इमारतींचा परिसर असल्याने या परिसरात सोयीसुविधा युक्त स्वतंत्र अग्निशमन केंद्र असावे अशी मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहोत. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सगळेच याकडे कानडोळा करत आहेत. यापूर्वी लेकहोम येथे घडलेल्या घटनेत ७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अजून किती जीव जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे?”
No comments yet.