मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये साकीनाका पोलिसांनी मंगळवारी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून सुमारे ५,१०,००० रुपये किंमतीचे ४६ चोरीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.
इम्रान अकबर अली सय्यद (वय ३५, राहणार पवई), दिपक रतनलाल जैस्वाल (वय ३१, रा. पालघर), सुभाष रामपालत बिंद (वय ३४, रा. विक्रोळी) आणि अतिक-उर रहमान चौधरी (वय ४१, रा साकीनाका) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सय्यद आणि चौधरी यांच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
साकीनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरानी रोड येथील रहिवासी दिलीश्वरी वर्मा यांनी २५ मे रोजी सुमारे सात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार केली होती. तपासा दरम्यान पथकाला एका मोबाईल शॉप मालकाने चोरीचे मोबाईल कमी दरात विकत घेतल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने साकीनाका पोलिसांनी दुकान मालक ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
“चौकशी दरम्यान अनेक चोरीचे मोबाईल सुभाष बिंद याने कमी दरात विकत घेतल्याचे उघड झाले. सदर मोबाईल तो त्याच्या विक्रोळी पार्कसाइट येथे असलेल्या त्याच्या दुकानात विकायचा. त्याच्या माहितीवरून आम्ही उर्वरित आरोपींना अटक केली आहे,” असे साकीनाका पोलिसांनी सांगितले.
अटक आरोपींचा आणखी किती गुन्ह्यात सहभाग आहे, तसेच त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? याचा साकीनाका पोलीस शोध घेत आहेत.
No comments yet.