तरुणांनी हटवला हरिश्चंद्र मैदानाच्या फुटपाथवरील कचऱ्याचा ढिग; कचरा फेकणाऱ्यावर ५०० रुपये दंड

पालिका, निवडून दिलेले स्थानिक प्रतिनिधी, नेते मंडळी यांना बगल देवून तरुणांनी आपला परिसर स्वतः साफ करत त्यांच्या सणसणीत कानाखाली देत आता पुढच्या वेळी तुमची साफ होण्याची बारी आहे असा संदेशच या कार्यातून दिला आहे.

कचरा हटवण्याच्या कार्यात सहभागी तरुण

आपला परिसर स्वच्छ राखणे, निटनेटका ठेवणे हे कोणा एकाचे काम नाही, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते. हेच ध्येय समोर ठेवत आयआयटी, पवई येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील तरुणांनी पुढाकार घेत स्थानिक निर्मित कचरा साफ केला.

परिसरातील हरिश्चंद्र मैदानजवळील फुटपाथवर कचऱ्याचा ढिग लागल्याने फुटपाथसह रस्त्यावरून चालणे अवघड झाले होते. येथून अवघ्या ५० मीटरच्या अंतरावर तीन विविध शाळेत जाणारे विद्यार्थी याच मार्गावरून प्रवास करत असतात. याची दखल घेत तरुणांनी पुढे सरसावत कचरा साफ करत परिसर कचरामुक्त केला. एवढ्यावरच न थांबता या परिसरात पुन्हा कचरा टाकला जावून कचरा डेपो तयार होवू नये म्हणून २४ तास विविध माध्यमातून येथे तरुणांकडून नजर ठेवली जाणार आहे. या भागात पुन्हा कचरा टाकणाऱ्याकडून ५०० रुपये दंड देखील आकारला जाणार आहे.

डावीकडे – फुटपाथवर जमा झालेला कचरा, उजवीकडे कचऱ्यात टाकलेला सोफा हटवताना तरुण.

शेखर राठोड, राहुल जमदाडे, किशोर गायकवाड, कुणाल इनकर, मोहित शिरसाट, अतुल माने, विशाल पंडागळे, विशाल सोनावणे, अरुण वड, विकास उघडे, अरविंद राठोड, गणेश सातवे, सुमित शिरसाट, आकाश शिरसाट, विकास पंडागळे या तरुणांनी पुढाकार घेवून येथील कचऱ्याची विल्हेवाट लावत आपला परिसर स्वच्छ केला.

“या परिसरात पुन्हा कचरा टाकला जावू नये तसेच आमचा परिसर सुंदर दिसावा म्हणून आम्ही या भिंती रंगवून त्याच्यावर चित्र देखील काढणार आहोत,” असे तरुणांनी सांगितले.

आयआयटी परिसर हा मुख्यत्वे बैठ्या चाळींचा परिसर पवईतील सर्वात जुन्या रहिवाशी परिसरांपैकी एक आहे. मात्र, आजही येथील नागरिक अनेक समस्यांशी लढत असून, काही सामान्य सुविधा देखील व्यवस्थित पोहचू शकलेल्या नाहीत. कचऱ्याची विल्हेवाट ही त्यातील एक मोठी समस्या आहे, अनेक परिसरात कचरा गाड्या पोहचत नसल्याने किंवा नागरिक मिळेल त्या मोकळ्या जागेत कचरा फेकत असल्याने येथील रोड, कोपऱ्यात कचऱ्याचे ढिगारेच्या ढिगारे पडून असतात.

कचरा हटवण्याच्या कामानंतर परिसर

“आसपासच्या डोंगराळ परिसरात राहणाऱ्या लोकांसोबतच चैतन्यनगर, गोखलेनगर येथील काही रहिवाशी कामावर येता-जाता, शाळेत मुलांना सोडायला, आणायला येता-जाता, रात्री येथे कचरा फेकून जात आहेत. पालिका हा कचरा आणि घन उचलत नसल्याने हळूहळू त्याचे कचरा डेपोत कधी रुपांतर झाले कोणाला कळालेच नाही,” असे तरुणांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “हळूहळू त्यामधून दुर्गंधी येत आजार पसरू लागल्याने स्थानिकांना त्रास जाणवू लागला आहे. चाळसदृश्य लोकवस्तीसह समोरच असणाऱ्या पवई नुक, गुलमोहर इमारतीत राहणारे अनेक लोक आजारी पडत आहेत.”

लोकप्रतिनिधी, पालिका यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला असल्याने अखेर आपला परिसर नीटनेटका स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे स्वीकारत रमाबाई नगरच्या तरुणांनी पुढाकार घेत संपूर्ण कचरा उचलून परिसर साफ करून घेतला आहे. तसेच ‘येथे कचरा टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल’ अशा सूचनेचे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत.

संपूर्ण पवईतून या तरुणांवर शाब्बासकीचा वर्षाव होत असून, इतर भागातील तरुणांनी यातून पुढे येवून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलण्याची मागणी होत आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!