सुषमा चव्हाण | पवई तलावावर नेहमीच मगरींचे दर्शन घडत असते, मात्र या लॉकडाऊनच्या निरव शांततेत पवईकरांना बिबट्याचे देखील दर्शन अनेक वेळा घडलेले आहे. त्यापाठोपाठच आता पवईत चितळांचाही मुक्त बागड दिसून आला आहे. साईबंगोडा येथील विहार तलावाजवळील बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात चितळांचा मुक्त बागड पहायला मिळाला. तेथील स्थानिक पवईकर दिपक निकुळे यांनी हा नयनरम्य क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
यापूर्वीही चितळ मानवी वस्तीमध्ये आल्याच्या घटना घडल्या आहेत. २२ एप्रिलला आयआयटी फुलेनगर जवळील डोंगर भागातील महाकाली मंदिरापाठीमागे उंचावरून पडून एका चितळाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या घटनेत पवईतील हनुमान टेकडीजवळील डोंगरावरून घसरून चितळ घराचे छत तोडून घरात पडल्याची घटना घडली होती. या घटनेत चितळ जखमी झाले होते.
लॉकडाऊनच्या या काळात सरकारने लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केल्यामुळे नेहमी वर्दळ असणारे मुंबईचे परिसर ओसाड पडले आहेत. सगळीकडे निरव शांतता पसरली आहे. याचाच फायदा घेत वन्यप्राणी, पक्षी यांचा मुक्त संचार सुरु असून, कधी पाण्याच्या तर कधी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेले हे वन्याजीव आता लोकांना उघड्या डोळ्यांनी बघण्याची संधी मिळत आहे.
शुक्रवारी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या साईबंगोडा येथील कुरणात चितळ हरणांचा कळप चरत मुक्तपणे बागडताना काही पवईकरांना पहावयास मिळाला. यावेळी हे चितळ इकडून तिकडे धावत मुक्तपणे बागडत होती.
“चितळांचा मुक्त बागड या भागात नेहमीच पहायला मिळत असतात. मात्र या लॉकडाऊनच्या काळात ते मानवी वस्त्यांच्या खूप जवळपर्यंत आलेले पहायला मिळत आहेत.” असे याबाबत बोलताना येथील काही स्थानिकांनी सांगितले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
#powai #dear_spotted #Chital #BNP #national park
No comments yet.