कचरा उचलण्याचे काम करणारा जुना कंत्राटदार राजू आम्हाला त्रास देण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य करत आहे – श्रीकांत पाटील (भाजप जेष्ठ कार्यकर्ते – वार्ड १२२)
पवईमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ पवई अभियान या उपक्रमाला खोडा घालत पवईमध्ये घाण पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
गोखलेनगर येथील एका पडक्या इमारतीच्या बाहेर फुटपाथवर जुन्या नगरसेवकाच्या काळात असणाऱ्या कंत्राटदार राजू भाई याने जाणूनबुजून कचरा आणून टाकल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला असून, राजू यांनी मात्र त्यांनी असे कोणतेच कृत्य केला नसल्याचा दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत पवईमध्ये भाजप वार्ड १२२ तर्फे सुद्धा ‘स्वछ पवई, सुंदर पवई’ उपक्रम राबवला जात आहे. मात्र या उपक्रमाला साथ देण्याऐवजी काही विरोधक या उपक्रमाचे तीनतेरा कसे वाजतील आणि जनता यांच्या विरोधात कशी उभी राहील याकडे जास्त कल असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
“आम्ही संपूर्ण वार्ड १२२ मध्ये प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम राबवून परिसरात असणारी घाण हटवण्याचे काम करतो. यामुळे लोकांनी उपक्रमाला चांगली पसंदी देत जनता सुद्धा आता या उपक्रमात सहभागी होऊ लागली आहे. मात्र काही विरोधकांना याचा त्रास होत असून, पूर्वीच्या नगरसेवकांच्या काळात कचरा उचलण्याचे कंत्राट मिळालेला राजू भाई याचे कंत्राट आता रद्द झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकून तो आता हे काम करणाऱ्या लोकांना नाहक त्रास देत आहे.” असे याबाबत बोलताना भाजप जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “गोखलेनगर येथे इमारत पाडल्याने मोकळ्या झालेल्या जागेत जमा झालेला कचरा राजू याने उचलून आणून सरळ रस्त्यावर टाकला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आजार पसरू लागले आहेत.”
आवर्तन पवई प्रतिनिधींनी या संदर्भात पालिका एस विभागात घनकचरा व्यवस्थापनाचे अधिकारी शिरसाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालिका नियमित येथून कचरा उचलते, “स्थानिक नगरसेवकांची फुटपाथवर कचरा टाकला असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे आम्ही त्वरित याबाबत कारवाई करू” असे सांगितले.
“त्या भागातील रस्त्यांवर असणारा कचरा उचलण्याचे काम हे पंकज इंगळे नामक इसमाच्या संस्थेचे आहे मात्र तो हे कार्य व्यवस्थित करत नसल्याचे समोर येत आहे याबाबत सुद्धा आम्ही चौकशी करू”, असे सुद्धा यावेळी बोलताना शिरसाळे यांनी सांगितले.
नागरिक यामुळे मात्र त्रस्त झाले असून, “कचरा कोणी टाकला? कोण उचलणार? याचा वाद घालत बसण्यापेक्षा ज्याला जमेल त्याने कचरा उचलण्याचे कार्य केले तर जनतेला दिलासा मिळेल आणि ती तुमच्या पाठीशी उभे राहील एवढे सुद्धा यांना कसे कळत नाही” असे यावेळी बोलताना गोखलेनगर आणि स्टार कॉ सोसायटीच्या नागरिकांनी सांगितले.
या संदर्भात राजू भाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे कोणतेही कृत्य केले नसल्याचे आवर्तन पवईला सांगितले.
“पालिकेचे कचरा टाकण्यासाठी असणारे कचऱ्याचे डब्बे सुद्धा काही बहाद्दरांनी लांबवले आहेत. वरून रस्त्यांवर, फुटपाथवर, मैदानात कचरा टाकून ते परिसरात आणखी घाण पसरवत आहेत. याबाबत लवकरच आम्ही पालिकेला लेखी स्वरुपात तक्रार करणार आहोत.” असे यावेळी बोलताना नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.
No comments yet.