पवई विहार स्थित गोपाल शर्मा मेमोरियल स्कूलने शाळेच्या प्राचार्या श्रीमती सुधा शरण यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शैक्षणिक रौप्यमहोत्सवी वर्ष मुंबईतील विविध शाळांसोबत मिळून साजरे केले. यासाठी दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पवईसह मुंबईतील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांचा भव्य संगम पाहायला मिळाला. सुमारे २० शाळांमधील १७५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी येथे आयोजित स्पर्धांमध्ये भाग घेतला.
रौप्यमहोत्सवी उत्सवात मुंबईतील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांची उपस्थिती यावेळी होती. यावेळी उपस्थित शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री प्रशांत शर्मा यांनी पवई येथे शाळा स्थापन करण्याच्या त्यांच्या वडिलांच्या स्वप्नाची आठवण ताजी करताना, या संस्थेने पाठीमागील २५ वर्षातील केलेल्या शैक्षणिक दर्जाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन’ या चित्तथरारक नाटकापासून ते ‘एम किक गोल’मधील विजेत्या किकपर्यंत, शाळेमध्ये उत्साह संचारला. ‘खजाने की खोज’ ने विविध शाळामधील सहभागीं स्पर्धकांना रोमांचकारी खजिन्याच्या शोधात नेले. तर ‘मास्टरपीस’ने सर्जनशीलतेच्या दोलायमान अभिव्यक्तींचे प्रदर्शन केले.
‘क्युलिनरी व्हेंचर’ आणि ‘फ्रेश फेस्ट’मध्ये पाककला कलात्मकतेचे दर्शन घडले. ‘माइंडफेस्ट’ने बुद्धीची कसोटी लावली. ‘सूरसंगम’मधून संगीत गुंजले. दरम्यान, ‘से इट विथ फ्लॉवर्स’ने सहभागींना मोहक पुष्पगुच्छ तयार करण्याची संधी दिली.
दोन दिवसीय उत्सवात खेळ आणि मनोरंजनाने प्रत्येकाच्या मनावर एक ठसा उमटवत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवला.
No comments yet.