बेकायदेशीर विक्रीसाठी घेवून जाणारा २ ट्रक गुटखा पवईमधून जप्त करण्यात आला आहे. पवई पोलिसांनी साकीविहार रोडवर या दोन ट्रकना ताब्यात घेत ही कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या गुटखा पानमसाल्याची किंमत बाजार भावाप्रमाणे ६६ लाख रुपये एवढी आहे. पवई पोलिसांनी सदर गुन्ह्यात २ आरोपींना अटक केली आहे.
महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना देखील पवई परिसरात गुटख्याचा मोठा साठा येणार असल्याची खात्रीलायक माहिती पवई पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) संतोष कांबळे यांना प्राप्त झाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि कांबळे आणि गुन्हे प्रकटीकरण पथक रात्री १०.२५ वाजता परिसरात गस्त घालत असताना दोन संशयास्पद ट्रक क्रमांक एमएच १४ एलबी ६९९३ आणि जेजे ०१ जेटी ६२९४ साकीविहार रोडवरून प्रवास करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. “हे दोन्ही ट्रक थांबवून त्यांची तपासणी केली असता, ट्रकमधून महाराष्ट्रात बंदी असणारे तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा पानमसाला घेवून जात असल्याचे उघडकीस आले.” असे यासंदर्भात बोलताना सपोनि कांबळे यांनी सांगितले.
“दोन्ही ट्रकमधून बाजार भावाप्रमाणे ६६ लाख रुपये किंमत असणारा गुटखा पान मसाला ताब्यात घेण्यात आला आहे,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
अशोक तांबे (३४) राहणार बीड आणि सोमेश्वर फलेरिया (३२) राहणार भिवंडी अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
“हस्तगत तंबाकूजन्य पदार्थ हे पकडण्यात आलेल्या ट्रकमधून उतरवून दुसऱ्या गाड्यांमध्ये भरण्यात येणार होते. त्यामुळे हा संपूर्ण माल कुठे जाणार होता किंवा कुठून आला होता? याच्याबद्दल अटक आरोपींना कसलीच माहिती नाही. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
No comments yet.