पवई, हिरानंदानीतील सर्वांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या हेरीटेज उद्यानाचे आज (बुधवार, २५ डिसेंबर) नामकरण करण्यात आले असून, आता हे उद्यान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, हिरानंदानी समूहाचे सुदैप्तो लाहिरी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पवई म्हटले कि पर्यटन प्रेमींच्या आकर्षणाचे ठिकाण, येथील हिरानंदानी भाग म्हणजे मुंबईकरांचे खास आकर्षण. येथील लोकांसोबतच आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी येथील पालिका उद्याने म्हणजे हक्काची जागा. असेच एक पालिकेचे उद्यान असणाऱ्या हेरीटेज उद्यानाची निर्मिती विकासक हिरानंदानी समूहाच्यावतीने हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आली आहे. हिरव्या गर्द झाडीत वसलेले हे उद्यान लहान मुलांना खेळण्याची साधने, ज्येष्ठांसाठी बसण्यासाठी आणि गप्पा गोष्टीसाठी हक्काच्या जागा, मोर्निंग वॉकर्ससाठी ट्रक, आणि परिवाराला एकत्रित बसून आनंद घेण्यासाठी पुरेपूर असे खास आकर्षण.
महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणाईचे तर हे हक्काचे ठिकाण. सध्या सेल्फी आणि फोटोच्या जगात येथे केलेल्या विशेष रचनांच्या ठिकाणी फोटो घेण्यासाठी तरुणांची गर्दी पाहायला मिळते. या उद्यानाच्या बाहेर असणारे कट्टे म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हक्काचे ठिकाण. अभ्यासाच्या चर्चेपासून मित्रांच्या वाढदिवसापर्यंत सगळ्यासाठी ते येथे जमा होतात. सुरुवातीला हिरानंदानी समूहातर्फे या उद्यानाची डागडुजी पाहिली जात होती, मात्र काही महिन्यांपूर्वीच पालिकेने ही जबाबदारी स्वीकारली आहे.
“येथील अनेक इमारतींना इंग्रजी नावे देण्यात आली आहेत. पवई सर्व स्तरातील लोकांची वस्ती आहे. म्हणूनच आमचे आदर्श आणि श्रद्धास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांची आठवण कायम राहण्यासाठी आम्ही येथील उद्यानांना त्यांची नावे द्यावीत अशी मागणी पालिकेकडे केली होती. याचाच पुढील भाग म्हणून आज येथील हेरीटेज उद्यानाला अटल बिहारी वाजपयी यांच्या जन्मदिनानिमित्त ते जनतेच्या मनात कायम रहावेत आणि नवीन पिढीला त्यांची आठवण रहावी म्हणून मंजुरीनंतर त्यांचे नाव देण्यात आले आहे”, असे याबाबत बोलताना नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.
“आम्ही केवळ नामकरण करून थांबणार नाही आहोत. लवकरच उद्यानात मुलांसाठी असणाऱ्या खेळण्यांची डागडुजी आणि इतर गोष्टींच्या दुरुस्तीचे काम सुद्धा आम्ही करणार आहोत आणि नागरिकांना नेहमीच चांगले आणि पुरेपूर असे उद्यान देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे”, असे यावेळी बोलताना नगरसेविका वैशाली पाटील यांनी आवर्तन पवईला सांगितले.
Congratulations and Grat Respect to Sri Atal Bihari Bajpayeeji…from BJP Noth East Cell ….jai Hind Bharat Mata Ki Jai ….