हिरानंदानी सुप्रीम बिजनेस पार्कच्या पाठीमागील भागात गेली ३ वर्षे वास्तव्य करून असणारा आणि सुप्रीम बिजनेस पार्कमध्ये कामासाठी येणाऱ्या अनेक लोकांना अधूनमधून दर्शन देणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वन अधिकाऱ्यांना यश आले आहे. पवईत ऑक्टोबर २०१३ ला पकडल्या गेलेल्या बिबट्यानंतर तीन वर्षात मुंबईत पकडला गेलेला हा पहिला बिबट्या आहे.
गेल्या आठवड्यात बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावला होता. याच पिंजऱ्यात शिकारीच्या शोधात घुसलेला हा ८ वर्षीय बिबट्या कैद झाला. त्याला सध्या बोरीवली राष्ट्रीय उद्यानात घेऊन जाण्यात आले असून, त्याची पूर्ण तपासणी करून लवकरच त्याला जंगल भागात सोडण्यात येणार आहे.
“आम्हाला बिबट्याला कैद करायचे नव्हते, मात्र तो त्याचे वास्तव्य असणाऱ्या डोंगर भागापासून जवळच असणाऱ्या सुप्रीम बिजनेस पार्कमधील काही कार्यालयांच्या परिसरात त्याचा वावर होता. याबाबत स्थानिकांच्या सतत तक्रारी येत होत्या. पाठीमागील महिन्यात येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील भागात तो शिकारीच्या शोधात आला असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर, वन विभागाच्या अधिकाऱ्यांची एक टिम बनवून त्याचा वावर असणाऱ्या परिसराची पाहणी केली होती” असे याबाबत बोलताना वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “कामगारांच्या जिवाला असणारा धोका पाहता परवानगी मिळवून गेल्या आठवड्यात आम्ही ३ कोंबड्या लावून पिंजरा लावला होता. दोन कोंबड्या त्याने बाहेरूनच फस्त केल्या, मात्र तिसरी कोंबडी पकडण्यासाठी तो पिंजऱ्यात गेला आणि पिंजऱ्यात सापडला. सध्या त्याला बोरीवली राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहे. त्याचा स्वभाव सध्या जरा चिडखोर झाला आहे, त्याच्या संपूर्ण तपासण्या करून येणाऱ्या अहवालाच्या आधारे त्याला जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल.”
आयआयटी कॉम्प्लेक्स परिसरात गेल्या आठ दिवसांपूर्वी आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी सुद्धा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी होत असतानाच वन विभागाने मात्र हे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.