सौदी अरेबियाचे नागरिकत्व प्राप्त झालेल्या “सोफिया रोबोट”ने काल (शनिवारी) आयआयटी पवईमध्ये सुरु असणाऱ्या टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नारंगी – पांढरी साडी नेसलेल्या सोफियाने यावेळी त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच नमस्ते इंडिया! मी सोफिया! अशी सुरुवात करत तिने उपस्थितांची मने जिंकली.
आशिया खंडातील सर्वात मोठा असा विद्यान – तंत्रज्ञानाचा फेस्टीवल म्हणून ओळख असणाऱ्या ‘टेकफेस्ट’ला गुरुवार पासून सुरूवात झाली. तंत्रज्ञानातील विविध आविष्कारांचा खजिना असलेल्या या फेस्टला देश-विदेशातील कॉलेज विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली आहे. या फेस्टच्या तिसऱ्या दिवशी सौदी अरेबियाचे नागरिकत्व असणाऱ्या ‘सोफिया’ या रोबोची उपस्थिती सर्वाधिक आकर्षणाची ठरली.
हॅनसन रोबॉटिक्सने निर्मिती केलेल्या या रोबोने एका देशाचे नागरिकत्व तर मिळवलेच आहे, मात्र ‘सोफिया’ ही जगातील पहिली आणि एकमेव मानवीय रोबो आहे.
आयआयटीच्या कॉन्वेकेशन हॉलमध्ये सोफिया विद्यार्थ्यांच्या भेटीला आली होती. सोफियाला लोकांना प्रश्न विचारता यावेत म्हणून ‘आस्क सोफिया’ या हशटगवर विचारलेल्या काही निवडक प्रश्नांना सोफियाने यावेळी उत्तरे दिली. यामुळे माणसांप्रमाणेच रोबोसुद्धा आपल्या भावना व्यक्त करू शकतो हे स्पष्ट झाले.
भारत भेटीबद्दल बोलताना येथील संस्कृती, विविधता आणि प्रथांमुळे भारावून गेल्याचे तिने सांगितले. येथील तंत्रज्ञानातील प्रगतीचे सुद्धा तिने यावेळी कौतुक केले.
No comments yet.