परदेश वारीच्या वेळी केलेल्या नाश्त्याचे नऊ हजार रुपये ट्रव्हल एजेन्सीकडून परत मिळविण्याच्या नादात एका गृहिणीला सव्वा लाख रुपयाचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पवई पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या ३९ वर्षीय तक्रारदार गृहिणीने मार्च महिन्यात पर्यटन सुविधा देणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या वेबसाईटवरून सिंगापूर येथे फिरण्यास जाण्यासाठी बुकिंग केले होते. या कंपनीने हॉटेल बुकिंगमध्ये राहण्याच्या सोयी सोबतच नाश्ता मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, हॉटेलमध्ये गेल्यानंतर नाश्त्यामध्ये फक्त ब्रेड, बटर आणि चहा देणार असल्याचे हॉटेलकडून सांगण्यात आले. याबाबत त्यांनी सुविधा पुरवणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तेव्हा त्यांच्या प्रतिनिधी कमलदीप त्रिपाठी यांनी तडजोडीनंतर ९ हजारांचा परतावा देण्याचे मान्य केले.
सिंगापूर येथून परत मुंबईत परतल्यानंतर तक्रारदार यांनी त्रिपाठी यांच्याकडे पैशांच्या परताव्याबाबत विचारणा केली. एप्रिल महिन्यापासून २३ जुलैपर्यंत तक्रारदार ह्या सतत पाठपुरावा करीत होत्या. मात्र त्यांच्याकड़ून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दुपारी त्यांनी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल केला. मात्र रिंग वाजून तो फोन कट झाला.
काही वेळातच त्यांना एक कॉल आला. समोरच्या व्यक्तीने आपण त्या सुविधा देणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार यांनी संबंधित कॉलधारकाकडे माझे परताव्याचे पैसे कधी मिळणार? याबाबत विचारणा केली. पैसे परत करण्यासाठी आपला ‘गुगल पे’ किंवा ‘फोन पे’ अकाउंटची माहिती द्या अशी त्याने विनंती केली. परंतु तक्रारदार यांच्याकडे दोन्हीही नसल्याने त्यांनी बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.
काही वेळातच त्यांना एक लिंक पाठवण्यात आली आणि त्यांना लिंकवर माहिती भरून देण्यास सांगितले. माहिती समोरच्या व्यक्तीला पाठवताच तक्रारदार यांच्या खात्यातून १ लाख ३४ हजार रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला.
काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच त्यांनी फोन आलेल्या नंबरवर पुन्हा फोन केला. मात्र कुणीही फोन उचलला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलिसांत याबाबत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
पवई पोलिसांनी या प्रकरणी भादवि सह माहिती तंत्रद्यान कायद्यान्तर्गत तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. तक्रारदार यांना प्राप्त झालेल्या फोन नंबरचे डीटेल्स मागवण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.