वर्षानुवर्ष विकासक आणि पालिका यांच्या अनुमतीत अडकून दुरावस्थेत पडलेल्या पंचश्रुष्टी रस्त्याला अखेर संजीवनी मिळाली आहे. चांदिवली विधानसभा आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या हस्ते मंगळवार, २६ जानेवारी रोजी या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण कामाचे उदघाटन पार पडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांसह, साकीनाका विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नागरे, पवई पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे, पंचश्रुष्टी फेडरेशनचे अध्यक्ष इंद्रनील चटर्जी, पदाधिकारी आणि परिसरातील रहिवाशी उपस्थित होते. येणाऱ्या ३ महिन्यातच हा मार्ग बनवून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच याच परिसरात असणाऱ्या अजून एक रस्त्याचे काम सुद्धा लवकरच सुरु करून दुहेरी मार्गाने वाहतूकीची सोय करण्यात येणार आहे.
चांदिवली आणि हिरानंदानी परिसराला पंचश्रुष्टी कॉम्प्लेक्स परिसरातून जाणारा रस्ता हा सगळ्यात मोठा दुवा आहे. मात्र विकासक आणि पालिका यांच्या पूर्तता आणि मंजुऱ्या यात अडकून पडल्याने पाठीमागील जवळपास २ दशकापासून हा रस्ता दुरावस्थेत पडला आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना वर्षानुवर्ष खड्डयातून आणि खराब मार्गानेच प्रवास करणे भाग पडत होते. “रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक नागरिक या परिसरात राहण्यास येण्यास टाळत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होता. आम्ही वर्षानुवर्ष याचा पाठपुरावा करत आहोत,” असे याबाबत बोलताना पंचश्रुष्टी फेडरेशनचे अध्यक्ष इंद्रनील चटर्जी म्हणाले.
“रस्त्याच्या खालून, पाईपलाईन, केबल गेले आहेत त्यामुळे त्याची पाहणी करून पूर्ण माहिती मिळवत या मार्गाचे काम करणे महत्वाचे आहे. तसेच या परिसरात राहणाऱ्या लोकांची रस्ता बनवताना गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे,” असे याबाबत बोलतान स्थानिक नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या या समस्येला पाहता चांदिवली विधानसभेचे स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी पाठपुरावा करत पालिकेतर्फे आता या परिसरात सिमेंट कॉंक्रीट रोडची मंजुरी मिळवली आहे. यासंदर्भात बोलताना लांडे म्हणाले, “येत्या काही दिवसातच पाहणी करून रस्त्याचे काम सुरु होईल. विशेष म्हणजे रहिवाशांच्या इच्छेनुसार येथील रस्त्याचे काम केले जाणार आहे. इतर ठिकाणी पालिकेतर्फे चालणाऱ्या प्रोजेक्टसारखी चालढकल येथे केली जाणार नाही. ३ महिन्यात हा रस्ता बनून वाहतुकीसाठी खुला केला जाईल.”
ते पुढे म्हणाले “या मार्गावर असणारी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सुद्धा सुरु असून, लवकरच चांदिवली आणि हिरानंदानी परिसराला जोडणारे अजून काही मार्ग नागरिकांसाठी खुले करण्यात येतील.”
रस्ता निर्मितीच्या कामासोबतच ड्रेनेज लाईन आणि स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम सुद्धा यावेळी केले जाणार असून, अनेक वर्ष खस्ता अवस्थेत असणाऱ्या या परिसराला आता नवसंजीवनी मिळाली आहे.
No comments yet.