चांदिवलीत सध्या चालू रोडची काम पूर्ण झाल्यानंतर डीपी रोड ९च्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याची चांदिवलीकरांची मागणी
चांदिवलीला जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडशी (जेविएलआर) जोडणारा आणि वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या डी पी रोड ९च्या दुरुस्तीच्या कामाचा नारळ शुक्रवारी फुटला. आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या या कामाचा शुभारंभाचा नारळ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फोडत शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार लांडे यांच्या सोबतच, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) भारतकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे) बुधन सावंत, पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपविभागप्रमुख सागर तुळसकर, शाखाप्रमुख अजय कांबळे, उप शाखाप्रमुख धनेश जाधव, युवासेना शाखाप्रमुख शैलेश पवार, हिरानंदानी रहिवाशी संघटनेचे संजय तिवारी उपस्थित होते.
विकास नियोजन रस्ता ९ (डी पी रोड ९) हा चांदिवलीला जेविएलआरशी जोडणारा एकमेव रस्ता सध्याच्या घडीला उपलब्ध आहे. मात्र रस्त्याची झालेली दुरावस्था आणि अतिक्रमण यामुळे या मार्गाचा वापर करणे कठीण झाले आहे. डी पी रोड ९ मार्गावरील अतिक्रमण हटवून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशी वारंवार प्रशासनाकडे करत होते. मात्र रस्ता बनण्याचे नाव घेत नव्हता. अखेर शुक्रवारी याच्या मुहूर्ताचा नारळ फोडत या रस्त्याचे काम लवकरच सुरु करणार असल्याचे आमदार लांडे यांनी सांगितले.
डी पी रोड ९ मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची असणारी वर्दळ पाहता दुर्गादेवी शर्मा मनपा शाळा ते रामबाग या अंतरात टप्प्या टप्प्यात या संपूर्ण रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीचा नारळ फुटला असला तरी चांदिवलीत चांदिवली फार्म रोड, शिवभक्तानी रोड, नहार डीपी रोड २, संघर्षनगर अशा सर्वच ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे. यासाठी काही भागात वाहतूक बंद करण्यात आली आहे, त्यामुळे चांदिवलीची आधीच चांगलीच कोंडी झाली आहे. जे पाहता डीपी रोड ९च्या दुरुस्तीचे काम सुरु करून पूर्णच कोंडी करण्यापेक्षा चांदिवलीच्या इतर भागात सुरु असणारी कामे संपल्यावरच डी पी रोड ९ रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी आवर्तन पवईच्या पाठपुराव्यात चांदिवली आणि पवईकरांनी केली.
डिसेंबर २०२२मध्येच या रस्त्याच्या कामाचे टेंडर काढण्यात आले आहे. मात्र चांदिवलीच्या इतर भागात चालू असणाऱ्या कामामुळेच पूर्ण वाहतूक कोंडी रोखण्यासाठीच हे काम रखडले आहे. शिवाजी महाराज चौक ते गुंडेचा हिल रोडचे काम पूर्ण होताच या रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या कामाला सुरुवात करू असे कंत्राटदाराच्यावतीने सांगण्यात आले.
या रस्त्याच्या निर्मितीची दरम्यात आणखी काही विकास कामे या रस्त्याला लागूनच असणाऱ्या जागेत करण्यात येणार आहेत. असेही यावेळी बोलताना आमदार लांडे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
“डीपी रोड ९ प्रमाणेच विकास आराखड्यातील आणखी एक नियोजित ९० फुट रोड जो साकीनाक्याला चांदिवली मार्गे जेविएलआरशी जोडतो या रस्त्याचे जेविएलआरच्या सुरुवातीला आणि चांदिवलीत एक भागात काम झाले आहे. त्याचे पुढे काय? त्याच्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्या रस्त्याच्या निर्मितीमुळे खूप मोठा मार्ग चांदिवलीला साकीनाका आणि जेविएलआरशी जोडणारा खुला होणार आहे. त्यामुळे आमदारांनी त्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी यानिमित्ताने चांदिवलीकरांकडून होत आहे.
No comments yet.