पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या एका नामांकित रुग्णालयातील २६ वर्षीय महिला डॉक्टरशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका ४३ वर्षीय इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या एका नामांकित रुग्णालयात आरोपी इसम संजय गांधी याने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या आईला कॅन्सर उपचारासाठी दाखल केले होते. तो नियमितपणे त्याच्या आईला भेटायला येत असे. या रुग्णालयात असणाऱ्या महिला डॉक्टर त्यांच्या आईच्या तपासणीसाठी येत असत. यावेळी आरोपी इसम त्यांच्याजवळ जाऊन त्यांना कॉफी, जेवणासाठी बाहेर जाण्याचे आमंत्रण देत असे.
“तक्रारदार आपले दिवसभराचे काम संपवून घरी परतत असताना आरोपी इसमाने त्यांचा पाठलाग करून, बोलण्याचा प्रयत्न करत त्यांना लिफ्टची ऑफरही दिली होती’, असे पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.
आईला सुट्टी मिळाली त्यादिवशीही त्याने माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत अश्लील हावभाव केला, असे तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर महिला डॉक्टरांनी पवई पोलीस ठाण्यात भादंवि कलाम ४३५ (डी)नुसार गुन्हा दाखल केला.
‘महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आम्ही आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे’, असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले यांनी सांगितले.
No comments yet.