पवई परिसरातील मिलिंदनगर भागात गस्त घालत असताना पवई पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीला १ किलो गांजासह अटक केली आहे. कैलाश शेषराव साबळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवई पोलीस त्याला गांजा विकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
यासंदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणासाठी पोलिसांकडून पायी गस्त घातली जात आहे. सोमवारी संध्याकाळी पवईतील मिलिंदनगर भागात वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संतोष सावंत यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राणे, पोलीस अंमलदार देशमुख, जाणकर व जावळे गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पद रित्या फिरताना दिसून आला होता.
“आम्ही त्याच्याकडे चौकशी करत असताना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे अर्धा किलो गांजा मिळून आला,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “त्याने हा संपूर्ण गांजा इतरांना विक्रीसाठी घेतला असण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक चौकशी सुरु आहे,” अंमलीपदार्थ विरोधी कायद्यातर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.