क्रुझ जहाजावर नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांना फसवणाऱ्या भामट्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ३५ हजार ते एक लाख रुपये घेवून या भामट्याने अनेक तरुणांना गंडा घातला असून, पवई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरार येथील गोकुळ टाऊनशिप येथे राहणारा अमित मोडक (अंदाजे वय ३५) याने हॉटेल आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तरुणांना क्रुझ जहाजावर नोकरी मिळून देण्याचे सांगितले होते.
क्रुझवर किचनमध्ये, हाउस कीपिंग, सुपरवायझर, वेटर, सुरक्षारक्षक आणि क्रुझवर येणाऱ्या लोकांच्यावर नजर ठेवण्याचे काम अशी विविध कामे मिळवून देतो असे त्याने नोकरीसाठी आलेल्या तरुणांना सांगितले होते. यासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पूर्ण करण्यासाठी त्याने तरुणांकडून ३५ हजार ते एक लाख रुपये सुद्धा घेतले होते.
पवईतील साकीविहार रोडवर राहणारे आणि पवईमधील एका हॉटेलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणारे मनोज कुमार राय (२८) यांना सुद्धा मोडक याने असेच आश्वासन दिले होते. तुम्हा पी, ओ किंवा डीझने क्रुझ लाईनवर नोकरी मिळवून देतो म्हणून सांगितले होते. तसेच त्याने त्याचे अजून काही मित्र असतील तर त्यांना सुद्धा घेवून ये म्हणून सांगितले होते.
पैसे देवून बरेच दिवस झाल्यावरनंतर सुद्धा जेव्हा काहीच माहिती मिळत नसल्याने मनोज याने मोडकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच संपर्क झाला नाही. आतापर्यंत जवळपास ८ ते १० तरुण फसवणूक झाल्याबाबत समोर आले आहेत. अजूनही बऱ्याच तरुणांची अशा प्रकारे फसवणूक झाली असून यातील काही तरुणांनी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समोर येत आहे. असे पवई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.