जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मिलिंदनगरजवळ बुधवारी एक भलामोठा ट्रेलर खड्यात चिखलात अडकल्याने तब्बल ९ तास जेव्हीएलआरवरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल झाल्याचे पहायला मिळाले.
बुधवारी सकाळी ६ वाजता मेट्रोच्या कामासाठी लागणारे टीबीएम मशिन घेवून एक ट्रेलर सिप्झच्या दिशेला जात होता. पाठीमागील काही दिवसात सतत पावसाची संततधार आणि मेट्रोच्या कामातील खोदकामामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलामुळे खड्यात हा भलामोठा ट्रेलर अडकला. वळण घेतानाच हा ट्रेलर अडकल्याने कांजूरमार्गकडून सिप्झकडे आणि सिप्झकडून विक्रोळीकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर हा ट्रेलर अडकून राहिल्याने संपूर्ण जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.
सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच हा ट्रेलर रस्त्यावर अडकल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याने ५ ते १० किलोमिटरचे अंतर चाकरमान्यांना चालत प्रवास करत कामावर पोहचावे लागले होते, त्यामुळे चाकरमानी चांगलेच संतापले होते. वाहनधारकांना मात्र या वाहतूक कोंडीत अडकून पडण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरला नव्हता.
यापूर्वीही जेव्हीएलआर निर्मितीच्या कामादरम्यान जवळपास १५ वर्ष अशाच प्रकारे मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. आता मेट्रोच्या ‘६’च्या कामामुळे ‘परिस्थिती जैसी थी’ झाल्यामुळे मुंबईकरांना यापुढेही आता मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत अशाच प्रकारे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्यामुळे मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे.
घटनेनंतर तत्काळ वाहतूक पोलिस, अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ट्रेलर हाटविण्याचे काम सुरू केले होते. ९ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनतर अखेर ट्रेलर बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले.
पवई चांदिवली थांबली
जेव्हीएलआरवर घडलेल्या घटनेमुळे जेव्हीएलआरवर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम पवई, चांदिवली भागात सुद्धा पहायला मिळाला. हिरानंदानीतून जेव्हीएलआरला जोडणाऱ्या रस्त्यावर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या फुग्यामुळे हिरानंदानी परिसरात दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चांदिवली फार्म रोड, नहार आणि चांदिवली भागात सुद्धा याचा परिणाम जाणवत वाहने कोंडीत अडकून पडली होती.
No comments yet.