५ फेब्रुवारीला पुणे येथील रांजणगाव येथे कार्यक्रमात सादरीकरण करत असताना मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या एका अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नृत्य तारका म्हणून प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री चांदिवली येथील नहार कॉम्प्लेक्समध्ये राहते.
अभिनेत्रीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ज्यानंतर या अभिनेत्रीने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपासासाठी तक्रार रांजणगाव पोलिसांना सुपूर्द केली जाणार आहे. या संपूर्ण घटनेला अभिनेत्रीने पुष्टी दिली आहे.
शिवसेनेच्या जिल्हा युवासेनेचे पदाधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री, अभिनेते उपस्थित होते. यावेळी कलाकारांचे सादरीकरण सुरु असताना तक्रारदार अभिनेत्रीशी या कार्यक्रमाच्या नियोजनाचा भाग असणाऱ्या एका दाम्पत्याने अर्वाच्च भाषेत बोलत वागणूक दिली. याचवेळी एका २१ वर्षीय तरुणाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिला लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक केली असल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तिच्या आईवडीलांना रात्री उशिरा फोन करून धमकावण्यात आल्याचे सुद्धा या अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
अभिनेत्रीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात झिरो नंबरने तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.
भादवि कलम ३५४, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्यातील सहभाग आणि तपास याच्यावर आवश्यकता भासल्यास इतर कलमांचा समावेश करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
No comments yet.