कलाकार चेतन राऊत यांचा मोझॅक पोर्ट्रेटच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांना सलाम

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. या संकटात अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. मग ते रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण बरे करणारे डॉक्टर्स, नर्स असो किंवा रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून अक्षरशः २४ -२४ तास बंदोबस्ताला उभे असणारे पोलिस असो किंवा या संकट काळातही समाजाला योग्य माहिती देणारे पत्रकार असो! या सर्वांचेच कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच विविध पोर्ट्रेट साकारून तब्बल १४ विश्वविक्रम करणारे कलाकार चेतन राऊत यांनी रियल हिरोच्या कार्याला गौरवण्यासाठी आणखी एक पोर्ट्रेट साकारत त्यांना मानवंदना दिली आहे.

१ मे ते १५ मे हा पंधरवडा ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून ओळखला जातो. सोबतच १२ मे म्हणजे ‘जागतिक परिचारिका दिन’ या साऱ्याचे औचित्य साधत चेतनने ६ रंगछटा असलेल्या ३२,००० पुश पिन चा वापर करून कोरोना योध्यांचे मोझेक पोर्ट्रेट चित्र साकारले आहे. साकारलेले पोर्ट्रेट ४ बाय ६ फूट लांबीचे असून, हे तयार करण्यासाठी चेतनला सिद्धेश रबसे, मयूर अंधेर व ४ वर्षांचा बाल कलाकार आयुष कांबळे यांनी साथ दिली आहे. अवघ्या ४८ तासात हे चित्र त्यांनी पूर्ण केले असून, कोरोनाचा आणि लॉकडाऊनचा विचार करता हे पोर्ट्रेट पवईमधील चेतनच्या राहत्या घरीच तयार केले आहे.

पोर्ट्रेटमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, परिचारिका म्हणून ब्लेसी मॅथ्यू, पोलीस म्हणून दिपक राऊत आणि पत्रकार म्हणून भूषण शिंदे यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे.

या कलाकृतीच्या विक्रीतून मिळणाऱ्या मिळकती पैकी ५०% मिळकत ही लॉकडाऊन काळातील गरजूंना अन्नदान करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे याबाबत बोलताना चेतनने सांगितले.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!