ऑनलाईन गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटवर गाडी विक्री करणाऱ्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पवई येथून अटक केली आहे. मोहम्मद अय्याज सय्यद (२८) असे त्याचे नवा असून, त्याच्या अटकेमुळे २०१८ पासून अद्यापपर्यंत मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
गाडी विक्री करणाऱ्या मालकाशी संपर्क साधून त्याला न वटणारा धनादेश देवून गाडीची चावी, कागदपत्र मिळाले की गाडी घेऊन पसार होत तिला तिसऱ्या व्यक्तीला जादाच्या भावाने विकायची. अशा प्रकारे ऑनलाईन गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून या भामट्याने मुंबईतील अनेक कार चालकांना फसवले आहे.
कार मालकांशी संपर्क साधून एक भामटा त्यांची फसवणूक करीत असल्याच्या घटना मुंबई परिसरात वाढल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांत दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते. कार विकणाऱ्या व्यक्तीला संपर्क करायचा, कार आणि मूळ कागदपत्रे हातात पडली की ठरलेल्या रक्कमेचा चेक सुपूर्द करायचा. मात्र हा चेक बाऊन्स होवून फसवणूक झाल्याचे अनेक गुन्हे मुंबईत घडत होते.
अनेक मुंबईकरांना अशा प्रकारे चुना लावणारा एक भामटा पवई परिसरात आपल्या एका नवीन सावजाच्या शिकारीसाठी येणार असल्याची माहिती मालमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक सावंत, सुनील कांगणे, विनोद पद्मन, आनंदा गेंगे, संतोष औटे, संदीप पाटील व किरण जगदाळे या पथकाच्या मदतीने पवई परिसरात सापळा रचला होता. मोहम्मद सय्यद हा तिथे येताच माने व त्यांच्या पथकाने सय्यदला अटक केली.
पोलीस चौकशीत त्याने गोरेगाव, एमआयडीसी, ओशिवरा, बांगूरनगर व उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे फसवणुकीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून बांगूरनगर व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या फसवणुकीतून गाडय़ा सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्ह्याची पद्दत
ऑनलाईन गाडय़ा विकणाऱयांना सय्यद हेरून त्यांना संपर्क साधत तो त्यांना प्रत्यक्ष भेटत असे. कार मालकाने ठरवलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे देण्याची तयारी तो दर्शवी. गाडी मालकाचा विश्वास बसावा म्हणून काही पैसे तो रोख स्वरुपात त्यांना देई आणि उरलेल्या पैशांचा धनादेश देऊन गाडी व गाडीचे कागदपत्र ताब्यात घेवून तिकडून निघाला की मोबाईल बंद करे. तीच गाडी मित्राची गाडी असून पैशांची गरज असल्याने गाडी विकत असल्याचे सांगत दुसऱ्याला जास्त किमतीत विकत असे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
सय्यद विरोधात अशा प्रकारच्या अनेक फसवणुकीचे गुन्हे यापूर्वीही दाखल आहेत. सदर गुह्यांत त्याला २०१८ मध्ये अटक सुद्धा झाली होती. तुरुंगातून जामीनावर मुक्तता झाल्यानंतर त्याने पुन्हा फसवणूक करायला सुरुवात केली होती.
No comments yet.